इंधन दरातील दररोजचे बदल ग्राहकांच्या पथ्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

१.२१ रुपयांचा फायदा - डिझेलमध्ये ५६ पैशांचा चढ-उतार
मिरज - पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये १६ जूनपासून दररोज बदल होत आहेत. गेल्या तीन आठवड्यांचा ट्रेंड पाहिला तर दरांमध्ये विशेष दखलपात्र वाढ झालेली नाही. १६ जून ते ७ जुलै या कालावधीत पेट्रोलमध्ये जास्तीत जास्त १ रुपया २१ पैशांचा फरक पडला. डिझेलचा चढ-उतार जास्तीत जास्त ५६ पैशांचा राहिला. 

१.२१ रुपयांचा फायदा - डिझेलमध्ये ५६ पैशांचा चढ-उतार
मिरज - पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये १६ जूनपासून दररोज बदल होत आहेत. गेल्या तीन आठवड्यांचा ट्रेंड पाहिला तर दरांमध्ये विशेष दखलपात्र वाढ झालेली नाही. १६ जून ते ७ जुलै या कालावधीत पेट्रोलमध्ये जास्तीत जास्त १ रुपया २१ पैशांचा फरक पडला. डिझेलचा चढ-उतार जास्तीत जास्त ५६ पैशांचा राहिला. 

इंधनाच्या दराचा प्रत्येक पंधरा दिवसांनी आढावा घेण्याचे सरकारचे आणि तेल कंपन्यांचे धोरण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू होते. महिन्याच्या प्रत्येक १५ आणि ३० तारखांना नवे दर यायचे. गेल्या दोन वर्षांत बहुतांश वेळा किमती  वाढत्याच राहिल्या. त्याच्या तुलनेत सध्याचा दररोजचा बदल ग्राहकांच्या फायद्याचा ठरला आहे. 

यापूर्वी पंधरा दिवसांनी होणारी दरवाढ थेट दीड ते अडीच-तीन रुपयांची असायची. गेल्या तीन आठवड्यांतील जास्तीजास्त फरक १ रुपया २१ पैशांचा आहे. पेट्रोलचा किमान दर २ जुलैरोजी ७३.२४ रुपये इतका राहिला.

जास्तीजास्त दर २३ जूनला ७४.४५ रुपये होता. डिझेलचा सर्वाधिक दर २३ जूनरोजी ५८.१० रुपये राहिला. सर्वांत कमी दर २ जुलैरोजी ५७.५४ रुपये होता. 

इंधनाच्या किमती दररोज रात्री दहा-अकरा वाजता पंपचालकांना कळवल्या जातात. रात्री बारापासून नव्या दरांची अंमलबजावणी करावी, अशी शासनाची सूचना आहे. सर्वांनाच दररोज मध्यरात्री येणे शक्‍य नसल्याचे पंपचालकांनी स्पष्ट केले; त्यामुळे दुसऱ्या दिवशी  सकाळी नऊ वाजल्यापासून नवा दर लागू करण्याचा  निर्णय संघटना व शासनाच्या बैठकीत मान्य करण्यात आला. सकाळी पेट्रोल पंपावर गेल्यावर किती पैसे  मोजावे लागणार याची चिंता ग्राहकांना सध्या लागून  राहते. प्रत्यक्षात बदलांचा आढावा घेतला असता दररोजच्या पेट्रोलच्या किमती दोन पैसे, पाच पैसे, सात पैसे, चौदा पैसे ९४ पैसे अशा बदलल्या आहेत. डिझेलचे दरही एक पैसा, दोन पैसे, आठ पैसे, नऊ पैसे, बावन्न पैसे असे बदलले आहेत. इतका नाममात्र चढ-उतार पाहता सरकारच्या नव्या धोरणाचा फारसा त्रास ग्राहकांना झालेला नाही हे स्पष्ट होते. किंबहुना तीन ाठवड्यांत १ रुपया २१ पैशांची पेट्रोल स्वस्ताई झाली आहे. २७, २८ आणि २९ जुलै असे सलग तीन दिवस पेट्रोलचे दर बदल न होता स्थिर राहिले.

एक शहर; दोन दर
सांगली-मिरजेतील काही मोजके पंप ऑनलाईन यंत्रणेशी जोडले आहेत. तेथे दररोज रात्री बारा वाजता  इंधन दरातील नवे दर आपोआप लागू होतात. अन्यत्र मात्र पंपचालकांना बदल करून घ्यावा लागतो. मध्यरात्री बदल करण्यासाठी येणे शक्‍य नसल्याने या चालकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता बदल करण्याचे धोरण अवलंबले आहे; त्यामुळे रात्री १२ ते सकाळी ९ या कालावधीत एकाच शहरात दोन पंपांवर दोन वेगवेगळे दर पाहायला मिळत आहे.