सोन्याच्या दुर्वा अन्‌ चांदीचे मोदक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मिरज - बाप्पाच्या जल्लोषी स्वागतासाठी सराफ बाजारही सज्ज झाला आहे. गणेशाच्या अकरा दिवसांच्या आराधनेत त्याला सजवण्यासाठी-धजवण्यासाठी सोन्या-चांदीचे आणि फॉर्मिंगचे हरतऱ्हेचे दागिने बाजारात उपलब्ध झाले आहेत. विघ्नहर्त्याच्या पाहुणचारात कोणतीही कसर राहू नये, याची दक्षता घेणाऱ्या भक्तांसाठी दागिन्यांचे अनेकविध पर्याय सराफ पेढ्यांनी उपलब्ध केले आहेत. 

सार्वजनिक मंडळांच्या सजावटीला तोडीस तोड सजावट अनेक जण घरोघरी करतात. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या बाप्पाची श्रीमंतीही तितकीच मनात ठसली पाहिजे, याची काळजी घेतात. त्याला सर्वांगाने दागिन्यांनी मढवून टाकतात. त्याच्यासाठी दागिन्यांची विविध मॉडेल्स बाजारात आली आहेत. सोन्याचा नेकलेस, शेला, कमरपट्टा हे त्यापैकीच काही दागिने. नेत्रदीपक चकाकणारा शेला आणि त्याच्या दोन्ही टोकांना मोत्याच्या झालरींमुळे बाप्पाचे प्रसन्न रूप आणखीच खुलते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला राजेशाही थाट मिळतो. जडवलेल्या रंगीबेरंगी खड्यांमुळे नेकलेसची झळाळी खुलून येते. मस्तकावर किरीट, कानात बाळ्या, सोंडेवर सोंडपट्टी, कानांचा विशालपणा खुलविण्यासाठीचे कान, मस्तकावर झुलणारे छत्र-चामर हेही हवेच. पूजेसाठी सोन्या-चांदीच्या दुर्वाही आहेत. शिवाय गदा, आरतीचे ताट, मोदकाचा प्रसाद हे सगळेही सोन्या-चांदीचेच. पुजेची सुपारी, जास्वंदाचे फुल, खाऊचे पान यांचीही सोय आहे. एवढेच नाही, तर बाप्पाच्या सेवेत अहोरात्र असणारा उंदीरमामाही सोन्याने झळाळून निघाला आहे. सोबत देखणे हत्तीही आहेत. 

दागिन्यांच्या किमती निश्‍चित करताना मंडळांच्या सजावटीबरोबरच घरगुती सजावटही लक्षात ठेवल्याची माहिती व्यावसायिक अभय गोगटे यांनी दिली. सोन्याच्या दागिन्यांच्या किमती काही हजार ते लाखांत आहेत. याला पर्याय म्हणून फॉर्मिंग ज्वेलरीही भक्तांच्या व कार्यकर्त्यांच्या पसंतीस उतरली आहे. एक ग्राम वजनातही दागिने उपलब्ध आहेत.