मान्यताप्राप्त डॉक्‍टरांची यादी गावोगावी फलकावर लागणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मिरज - प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात त्या-त्या गावातील पात्र डॉक्‍टरांची यादी प्रदर्शित करण्यात येणार आहे. बोगस डॉक्‍टर ओळखले जावेत, त्यांच्यावर वचक बसावा यासाठी उपक्रम राबवला जात आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शिंदे यांनी दिली.

वर्षभरात बोगस डॉक्‍टरांमुळे मिरज तालुका बराच चर्चेत आला. विशेषतः म्हैसाळमधील डॉ. खिद्रापुरे यांच्या कारनाम्यांमुळे पश्‍चिम महाराष्ट्र हादरला. बोगस डॉक्‍टरांविरोधी मोहिमेला वेग आला. त्यांना जाळ्यात पकडण्यासाठी अनेक छापे टाकण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून पात्र डॉक्‍टरांची यादी लावण्याचा निर्णय झाल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

तालुक्‍यात आठ आरोग्य केंद्रे आणि 48 उपकेंद्रे आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या पात्र डॉक्‍टरांची नावे आरोग्य कर्मचाऱ्यांनी संकलित केली आहेत. मेडिकल कौन्सिल आणि आरोग्य विभागाकडे नोंद असणाऱ्या ऍलोपॅथी व होमिओपॅथी डॉक्‍टरांचा त्यात समावेश आहे. त्यांची यादी प्रत्येक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामपंचायतीत लावण्यात येणार आहे. या यादीमुळे गावातील रहिवाशांना अधिकृत डॉक्‍टर समजतील. त्याव्यतिरिक्त कोणी डॉक्‍टर असल्याचे सांगून उपचार करीत असतील तर ग्रामस्थांनी त्याची माहिती आरोग्य विभागाला द्यावी, असेही त्यांनी सांगितले.