मिटिंगला नवऱ्याला पाठवले तर चालेल काय? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मिरज - "पंचायत समितीच्या मासिक सभेला विभाग प्रमुख दांडी मारतात; सामान्य कर्मचाऱ्याला बदली म्हणून पाठवतात. यामुळे आमची कामे होत नाहीत. तुमच्याप्रमाणेच सभेसाठी बदली म्हणून आमच्या पतीला पाठवू काय ?' असा उद्विग्न करणारा सवाल महिला सदस्यांनी विचारला. अधिकाऱ्यांच्या टाईमपासवर त्या भलत्याच कडाडल्या. यामुळे संपूर्ण सभागृहात सन्नाटा पसरला. सभेचे स्वरूप अचानक गंभीर झाले. 

मिरज पंचायत समितीच्या आजच्या मासिक सभेत हा प्रसंग ओढवला. माधवनगरच्या सदस्या छाया दिनकर हत्तीकर यांनी खडा सवाल फेकला आणि समोरचा अधिकारी एका क्षणात निरुत्तर झाला. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत पन्नास टक्के आरक्षण मिळाल्यापासून त्यांच्यातील रणरागिणीची रूपे वेळोवेळी मतदारांनी अनुभवली आहेत; त्याचेच एक रूप आजही पहायला मिळाले. सभेत आढाव्यासाठी तालुका कृषी विभागाच्या नावाचा पुकारा झाला, तेव्हा विभाग प्रमुखाऐवजी त्यांचे सहायक पुढे आले. "साहेब ट्रेनिंगसाठी पुण्याला गेल्याने येऊ शकले नाहीत' असा खुलासा केला. त्यावर सौ. हत्तीकर चांगल्याच संतापल्या. म्हणाल्या,""तुमच्या साहेबालाच कामे असतात असे नाही, आम्हालाही असतात. आम्ही बिनकामाचे म्हणून सभेला येत नाही. आम्ही आडवेतिडवे प्रश्‍न विचारतो, त्याची उत्तरे तुम्हाला देता येतील काय? आमच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळत नाहीत; कामेही होत नाहीत. यासाठी साहेबांनाच पाठवत चला. सभेला बदली अधिकारी चालत असेल तर आम्हालाही बरीच कामे आहेत; आमच्याऐवजी नवऱ्याला पाठवू काय?''  सौ. हत्तीकर यांच्या बिनतोड सवालाने सगळेच चकित झाले. सभापती जनाबाई पाटील, उपसभापती काकासाहेब धामणे, सहायक गटविकास अधिकारी संजय शिंदे यांच्यासह कृषी विभागाचे बदली अधिकारी निरुत्तर झाले. त्याच अवस्थेत कृषी अधिकाऱ्यांनी गटशेतीची माहिती द्यायला सुरवात केली. मात्र ते सदस्यांच्या शंकाना समधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यांच्याकडे पुरेशी माहितीही नव्हती; अनेकदा अडखळले. त्यामुळे पुन्हा हत्तीकर यांचा राग उफाळला. "म्हणूनच सांगते की साहेबांना यायला सांगत चला, पुढच्या वेळी ते आले नाहीत तर आम्हाला विचार करावा लागेल' असा इशारा त्यांनी दिला. स्त्रीशक्तीचे आक्रमक रूप यानिमित्ताने आज सभागृहाने अनुभवले. 

Web Title: miraj news Miraj Panchayat Samiti