मिरज-सांगली रस्त्याला मिळणार झळाळी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मिरज - मिरज-सांगली रस्त्यावर उभारल्या जाणाऱ्या पथदीपांमुळे रस्त्याला कॉर्पोरेट लुक आला आहे. काही दिवसांत दिवे प्रकाशमान झाल्यानंतर या रस्त्याचे सौंदर्य आणखी खुलणार आहे. 

मिरज - मिरज-सांगली रस्त्यावर उभारल्या जाणाऱ्या पथदीपांमुळे रस्त्याला कॉर्पोरेट लुक आला आहे. काही दिवसांत दिवे प्रकाशमान झाल्यानंतर या रस्त्याचे सौंदर्य आणखी खुलणार आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शासनाच्या अनुदानातून पथदीप उभारण्याचे काम सुरू आहे. 88 लाखांच्या निधीतून 86 पथदीप उभारले जातील. त्यात सहा हायमास्ट दिव्यांच्या समावेश आहे. जेथे मुख्य कार्यालये, इमारती किंवा चौक आहेत, तेथे हायमास्ट दिवे असतील. उर्वरित ठिकाणी नेहमीच्या उंचीचे खांब असतील. रस्त्याच्या दुभाजकांत ते उभारले जात आहेत. महिनाभरात ते कार्यान्वित होतील. त्यानंतर हा रस्ता झळाळून उठेल. सांगली आणि मिरज ही शहरे महापालिका स्वरूपात एकच असली, तरी हा रस्ता मात्र सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारित आहे. चौपदरीकरण होऊन काही वर्षे झाली, तरी रस्ता अंधारातच होता. एका बाजूचे सोडियम व्हेपरचे मिणमिणते दिवे पुरेसा प्रकाश देत नव्हते. विश्रामबागपर्यंत त्यावर अंधारच पसरलेला असायचा. उशिरापर्यंत वर्दळ असल्याने अंधारात अपघातांना निमंत्रण मिळायचे. पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना त्रास व्हायचा. पथदीप उभारल्याने रस्ता उजेडात माखून निघेल. दोन्ही शहरे एका अर्थाने आणखी जवळ येतील. मिरजेत गांधी चौकापासून सांगली रस्त्यावर पार्श्‍वनाथनगरपर्यंत दिवे बसविले आहेत. दुभाजकांत हिरवळ आणि मध्ये झगमगता प्रकाश देणाऱ्या दिव्यांमुळे रस्त्याला मुंबई-पुण्यासारखा कॉर्पोरेट लुक आला आहे. कंत्राटातील तरतुदीनुसार त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पाच वर्षांसाठी ठेकेदारावरच असेल. 

सदोष उभारणी 
पथदीपांची उभारणी सदोष असल्याचे पाहताक्षणीच जाणवते. सर्व खांब एका रांगेत दिसत नाहीत. ते पुरण्यासाठी पुरेसे खोल खड्डे काढले नसल्याचीही तक्रार आहे. या रस्त्यावर रोज हजारो वाहने धावतात. एखाद्या वाहनाच्या थोड्याशा धडकेतही खांब कोसळू शकतो. त्यामुळे त्याची उभारणी आताच मजबूत होण्याची गरज आहे.