मिस कॉल देवून घरपोच मिळवा किराणा 

परशुराम कोकणे
सोमवार, 23 एप्रिल 2018

सोलापूर - मोबाईलवर मिस कॉल दिल्यावर तुम्हाला लगेच फोन येतो... सर, मॅडम तुम्हाला काय हवे आहे..? असे विचारून आवश्‍यक किराणा मालाची यादी केली जाते... आणि मग काही वेळातच तुमच्या घरी किराणा माल पोचविला जातो! स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात शुभांगी दुलंगे या तरुणीने 'स्टोअर टू डोअर' ही किराणा मालाची घरपोच सेवा सुरू केली आहे. 

सोलापूर - मोबाईलवर मिस कॉल दिल्यावर तुम्हाला लगेच फोन येतो... सर, मॅडम तुम्हाला काय हवे आहे..? असे विचारून आवश्‍यक किराणा मालाची यादी केली जाते... आणि मग काही वेळातच तुमच्या घरी किराणा माल पोचविला जातो! स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात शुभांगी दुलंगे या तरुणीने 'स्टोअर टू डोअर' ही किराणा मालाची घरपोच सेवा सुरू केली आहे. 

मॉल, सुपर मार्केट किंवा मग दुकानात तास-दीड तास थांबून किराणा माल, इतर साहित्याची खरेदी करताना आपल्यापैकी अनेकजण थकून जातात. खरेदी केलेला माल घरी आणेपर्यंत चांगलीच धावपळ होते. पीठ, मीठ, दाळ, साखर, तेल यासह आवश्‍यक माल घेताना अनेकदा मॉल, सुपर मार्केटमध्ये अनावश्‍यक खरेदीही होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी तर हा सारा प्रकार खूपच त्रासदायक असतो. मॉल किंवा सुपर मार्केटमध्ये विकला जाणारा माल आपल्याला स्वस्त वाटत असला तरी अनेक ठिकणी ग्राहकांना नकळत लुटले जात आहे. दुप्पट दर लावून माल विकला जात आहे, असे शुभांगी यांनी सांगितले.

शुभांगी या लॅब टेक्‍निशियन आहेत. तसेच गेल्या चार-पाच वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही चालू आहे. त्यांनी काही परीक्षाही दिल्या आहेत. स्मार्ट सोलापूरकरांची गरज ओळखून त्यांनी काही दिवसांपूर्वी 'स्टोअर टू डोअर' ही घरपोच किराणा मालाची सेवा सुरू केली आहे. या माध्यमातून त्यांनी दोघा तरुणांना कामही दिले आहे. मिस्ड कॉल आल्यानंतर अनेकदा त्या स्वत:ही माल घेऊन जातात. ही सेवा सुरू करण्याआधी त्यांनी शहराच्या विविध भागांत फिरून किराणा मालाच्या दराचा सर्व्हेही केला आहे. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे शुभांगी यांनी या व्यावसायाची सुरवात एचआयव्ही बाधित मुलांना खाऊ वाटपाने केली आहे. 

स्मार्ट सोलापूरकरांना 'स्टोअर टू डोअर' सेवा द्यावी हा विचार खूप दिवसांपासून डोक्‍यात होता. आई वर्षा, वडील शिवानंद दुलंगे आणि भावांच्या पाठिंब्यामुळे किराणा मालाची घरपोच सेवा देण्यास सुरवात केली आहे. कमी दरात आणि चांगला माल देण्यावर आमचा भर आहे. हा व्यवसाय नसून सेवा आहे. विश्‍वास हे एकमेव सूत्र आम्ही पाळणार आहे. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक खरेदीला बाहेर जाऊ शकत नाहीत, त्यांना या सेवेचा नक्कीच उपयोग होईल. भविष्यात किराणा मालासोबतच भाजीही देण्याचा विचार आहे. 
- शुभांगी दुलंगे, किराणा घरपोच देणारी तरुणी

Web Title: on missed call get your grocery home delivery