मिशन जुलै 2018 चे चित्र बहुरंगीच 

मिशन जुलै 2018 चे चित्र बहुरंगीच 

जिल्हा परिषदेतील झिरो टु हिरो या कामगिरीनंतर अशाच कामगिरीच्या पुनरावृत्तीसाठी भाजपच्या नेत्यांची खलबते सुरू झाली आहेत. महापालिकेची निवडणूक आता सतरा अठरा महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि ताज्या पानिपतानंतर कॉंग्रेस नव्याने उभारी घ्यायच्या मन:स्थितीत नाही. राष्ट्रवादीला इथेही आऊटगोईंगची भीती आहेच मात्र अधिक कॉंग्रेसला आहे. त्यासाठी भाजपकडून टोकरा टोकरी सुरूही झालीय. या प्रस्थापितांच्या घडामोडीशिवायही पडद्याआड एका नव्या आघाडीचा जन्म होऊ पाहतोय. तिचे स्वरूप आणि सहभागी घटक अद्याप ठरलेले नाहीत; मात्र या सर्वच प्रस्थापितांना बाजूला सारून महापालिकेत एक नवे पर्व सुरू करण्याचा मनोदय या आघाडीचा असेल. 

शून्यावरून थेट सत्तेत ही भाजपची कामगिरी भलेही राष्ट्रवादीच्या आयात रसदीवर असेल; मात्र यातून पक्षाचा दुणावलेला आत्मविश्‍वास आता टिपेला पोहोचला आहे. पुढच्या महापालिका मिशन जुलै 2018 चा नारा पक्षाच्या अनेक नेत्यांनी खासगीत देऊनही टाकला आहे. एक खासदार आणि दोन आमदार महापालिकेशी संबंधित आणि गल्ली ते दिल्ली अशी पाठीशी सत्ता असताना पालिका किस झाड की पत्ती अशी त्यांची भावना आहे. खासदार संजय पाटील, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, विठ्ठल पाटील, नीता केळकर, मकरंद देशपांडे, युवराज बावडेकर यांच्या खांद्यावर भाजपच्या या पालिका दिग्विजयाची जबाबदारी असेल. जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर गेल्या काही दिवसांत पालिका क्षेत्रात भाजप नेत्यांकडून यादृष्टीने चाचपणीही सुरू झाली आहे. 

माजी मंत्री मदन पाटील यांची तीन दशकांपासूनची महापालिका क्षेत्रावरील पकड ढिली करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी महाआघाडी नामक सर्कस उभी केली. मात्र रिंग मास्टर म्हणून त्यांची जी काही दशा झाली ती सर्वज्ञात आहे. तरीही महापालिकेवर यापुढच्या काळात अशी एकहाती पकड राहिलेली असेल ती जयंत पाटील यांचीच असेल. कारण अन्यत्र नेत्यांची गर्दी असेल. आणि 24 तास वेळ, पैसा आणि बुद्धी खर्च करण्यात जयंतरावांइतका सक्षम नेता अन्य पक्षात नाही. तथापि सत्तेच्या सुरवातीच्या काळात कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असे सध्याचे ढोबळमानाने असलेले दुरंगी चित्र आता संभाजी पवार-शरद पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी आघाडी आणि कॉंग्रेसमधील उपमहापौर गट नामक शेखर माने यांची युती असा तिसरा भिडू पालिकेच्या राजकारणात सक्रिय झाला आहे. मदन पाटील यांच्या पश्‍चात कॉंग्रेसची अवस्था "बडा घर पोकळ वासा' अशी झाली आहे. नेत्या जयश्री पाटील यांच्या नावाचा टिळा लावून महापालिकेतील सत्ताधारी काम करीत आहेत. मात्र ते केवळ दाखवण्यापुरते चित्र आहे. आज त्यांचे नेतृत्व मानणाऱ्या नगरसेवकांची बेरीज पंधरांवर जाणेही अवघड झाले आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांमधील काहींनी मांडलेला महापौर बदलाचा डाव थबकला आहे. महापालिकेत लक्ष घालण्याच्या पतंगराव कदम यांच्या मनसुब्यांना जिल्हा परिषदेतील पतनामुळे अडथळेच अडथळे निर्माण झाले आहेत. दुसरीकडे विशाल पाटील गट आणि जयश्री पाटील यांच्यातील सत्तेसाठीचा संघर्षच हेच कॉंग्रेसपुढील पहिले आव्हान असेल आणि जरी ते एकत्र आले तरी ते जिंकून देऊ शकतील यावर आता कॉंग्रेसमधील विद्यमान नगरसेवकांचा विश्‍वास उरलेला नाही. हे त्यांच्या मिरज तालुक्‍यातील कामगिरीवरून पुरेसे लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सोयीची ठरतील अशा आश्रयस्थानांचा कॉंग्रेसमधील अनेक नगरसेवकांकडून शोधही सुरू झाला आहे. अर्थात ज्यावर निवडणुकीची मोठी गणिते अवलंबून असतात असे प्रभागांचे आरक्षण हा सर्वांत मोठा जुगार अद्याप बाकी आहे. 

प्रस्थापितांच्या या हालचाली गतिमान असताना पालिकेच्या राजकारणात एक चौथाच पर्यायही आजमावला जात आहे. माजी आमदार संभाजी पवार यांचे चिरंजीव पृथ्वीराज आणि गौतम यांनी कालच "आम्ही शतप्रतिशत शिवसेनेतच राहू,' असे सांगत महापालिका निवडणुकीचाही अप्रत्यक्षपणे उद्‌घोष केला आहे. अगदी वसंतदादांच्या हयातीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नागरिक संघटनेच्या झेंड्याखाली डॉ. देवीकुमार देसाई यांनी सांगलीच्या नगराध्यक्षपदावर कब्जा केला होता. पवार गटाची पालिकेची धुरा वाहणारे गौतम पवार व त्यांच्यासोबत आलेले मदनभाऊ युवा मंचचे माजी अध्यक्ष सतीश साखळकर यांनी अशी काही आघाडी अस्तित्वात येऊ शकेल का यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी हरित न्यायालयात धाव घेत महापालिकेवर बरखास्तीची तलवार उपसण्यापर्यंत मजल मारलेल्या जिल्हा सुधार समितीच्याही गेल्या दीड वर्षात भागा भागात हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रामाणिक कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभे करण्याचा त्यांचा खटाटोप सुरू आहे. याशिवाय उपमहापौर गटाचा सवता सुभा मांडणारे शेखर माने कॉंग्रेसच्या प्रस्थापित राजकारणाविरोधात उभा संघर्ष सुरू केला आहे. त्यांची आगामी पालिका निवडणुकीतील भूमिका नेमकी काय राहणार याबाबतही पालिका वर्तुळात कुतूहल आहे. मदन पाटील या एका सत्ताकेंद्राचा अस्त आणि पालिका राजकारणात येऊ पहात असलेले नवे नवे प्रवाह यामुळे पुढील वर्षातील पालिका निवडणूक बहुरंगी असेल यात आता कोणतीही शंका उरलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com