आमदार-खासदारांतील वादावर भाजपचे मनसुबे

Udayanraje-and-Shivendrasinhraje
Udayanraje-and-Shivendrasinhraje

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार-खासदारांमधील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. पालिका निवडणुकीपासून विकोपाला चाललेल्या या वादाकडे जिल्ह्यात यश मिळविण्याचा चंग बांधलेल्या भारतीय जनता पक्षाच्या धुरिणांचे बारीक लक्ष आहे. दोन्हींपैकी कोणीही गळाला लागले, तरी जिल्ह्यातील निवडणुकांचे चित्र बदलू शकते. त्यामुळे भाजपचे मनसुबे उधळण्यासाठी राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचे कसब पणाला लागणार आहे.

सातारा पालिका निवडणुकीत बहुचर्चित मनोमिलन तुटले. तेव्हापासून शिवेंद्रसिंहराजेंनी आपली शैली बदलली. देहबोलीपासून प्रत्यक्ष वागण्यामध्ये एक आक्रमकता आणली. त्यामुळे साताऱ्यात पुन्हा काट्याची टक्कर सुरू झाली आहे. आनेवाडी टोलनाक्‍याच्या हस्तांतरणावेळी हा वाद टोकाला गेला. दोन्ही नेत्यांबरोबरच त्यांच्या कार्यकर्त्यांनाही याची झळ पोचली. 

हे प्रकरण निवळेपर्यंत 
शहरातील राजकीय वातावरण शांत होते. दोन्ही नेते व जवळच्या कार्यकर्त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला. त्यानंतर कलगीतुरा पुन्हा रंगू लागला आहे. हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने शिवेंद्रसिंहराजे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर व्यासपीठावर उदयनराजेंवर हल्ला चढवला. पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. तेव्हा त्यांचा पवित्रा ‘करो या मरो’चाच दिसत होता. पालिकेतील गैरकारभाराच्या मुद्यावरून दोन्ही नेते पुन्हा आमने-सामने आले आहेत. दोन्हींकडून प्रखर शब्दात टीका सुरू आहे.  

याला कारणीभूत आहेत पालिका निवडणुकीतील उदयनराजेंची वक्तव्ये आणि त्याचा सातारकरांवर झालेला परिणाम. साताऱ्याचा पुढचा आमदार सर्वसामान्य माणूसच असेल, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्याची शहरासह जिल्ह्यात चांगलीच चर्चा झाली होती. पुढे सातारा विकास आघाडीला नगराध्यक्षपद मिळाले. नगराध्यक्षासाठी सातारा विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाला पडलेल्या मतांची बेरीज शिवेंद्रसिंहराजेंना विचार करायला लावणारी अशीच होती. शहरातील किती मते आमदारांच्या विरोधात आहेत, हे या वेळी स्पष्ट झाले होते. त्यातून आगामी काळात राजकारण कुठे कलाटणी घेऊ शकते, याची झलक पाहायला मिळाली होती. त्यामुळे राजकारणातील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी-वाढविण्यासाठी तेव्हापासून आमदारांची जोरदार बांधणी सुरू झाली. आक्रमक वाटणाऱ्या उदयनराजेंना तोंड देण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेही आक्रमक झाले. प्रतिमा बदलण्याचे जाणीवपूर्व प्रयत्न होत आहेत. त्यात फलटणकरांचीही साथ मिळाली.

उदयनराजेंना तीन महिने साताऱ्यातून बाहेर राहावे लागले. सोना अलाईज आणि टोलनाक्‍याचे वार वर्मी होते. भाजप व मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधत उदयनराजेंनी ते उलटवले.

सातारा पालिकेप्रमाणेच उदयनराजेंनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेलाही तालुक्‍यात भाजपशी हातमिळवणी केली. मात्र, ती सर्व जागांवर होऊ शकली नाही. दोघांचे उमेदवार असलेल्या काही ठिकाणी आमदार गटाचा विजय झाला. त्या मतांची बेरीज केली तर, पंचायत समितीच्या सत्तेचे चित्रही बदलू शकले असते. 

आकड्यांच्या या समीकरणाकडे भाजपमधील धुरिणांचे बारीक लक्ष आहे. जिल्ह्यातील माण, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण व सातारा या पाच मतदारसंघांमध्ये भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, या पाचही मतदारसंघांमध्ये प्रभाव पाडण्यासाठी, तेथील गणिते पक्की करण्यासाठी त्यांना साताऱ्यातील खासदार किंवा आमदारांची गरज आहे. तीन मतदारसंघांवर तर, दोघांचा थेट प्रभाव आहे. 

उदयनराजे काही प्रमाणात माण व कऱ्हाड दक्षिणमध्येही प्रभाव पाडू शकतात. या दोघांपैकी एकाशिवाय राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचे भक्कम बुरूज ढासळणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे या दोघांच्या वादाकडे भाजप बगळ्याप्रमाणे लक्ष ठेवून आहे. उदयनराजे भाजपमधून निवडून येतील का, उदयनराजेंना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले तर, शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये जातील, अशा चर्चा त्याचाच एक भाग आहे. जनमताचा कानोसा घेण्याचा, अशा प्रसंगांना स्वीकारण्याची राष्ट्रवादीप्रेमी जनतेची मानसिकता बनविण्याचाच हा एक भाग आहे. त्यामुळे जिल्ह्याचा गड शाबीत राखण्यासाठी पक्षाध्यक्षांना साताऱ्यातील हा तिढा हळूवापरपणे सोडवावा लागणार आहे. त्यामध्ये त्यांचे कसब पणाला लागणार हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com