आमदार निधी पाच कोटी करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - दोन वर्षांतील सरकारची कामगिरी समाधानकारक आहे. राज्य प्रगतीपथावर असून, उर्वरित तीन वर्षांत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असेल, असा सूर आज "सकाळ'च्या वतीने राज्य सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजित आमदारांच्या बैठकीत ऐकायला मिळाला. आमदार निधी दोन कोटींवरून पाच कोटी झाला पाहिजे ही मागणीही यावेळी केली.

कोल्हापूर - दोन वर्षांतील सरकारची कामगिरी समाधानकारक आहे. राज्य प्रगतीपथावर असून, उर्वरित तीन वर्षांत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असेल, असा सूर आज "सकाळ'च्या वतीने राज्य सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजित आमदारांच्या बैठकीत ऐकायला मिळाला. आमदार निधी दोन कोटींवरून पाच कोटी झाला पाहिजे ही मागणीही यावेळी केली.
राज्य सरकारला 30 ऑक्‍टोबरला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरकारबरोबरच आमदारांच्या कामकाजाचा लेखाजोखा जाणून घेण्याचा प्रयत्न "सकाळ'च्या वतीने करण्यात आला. जिल्ह्यात विधानसभेच्या दहा आमदारांपैकी प्रत्येकी दोन राष्ट्रवादी व भाजपचे, तर तब्बल सहा आमदार शिवसेनेच आहेत. विधान परिषदेवर कॉंग्रेसचे सतेज पाटील एकमेव आमदार आहेत. या सर्वांनी राज्यात गेल्या दोन वर्षांतील सरकारच्या कामाचा लेखाजोखाच "सकाळ'कडे मांडला.

राज्य सरकार हे घोषणा करण्यात आघाडीवर आहे, त्यातून प्रसिद्धीचा स्टंट सुरू असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. राज्याची वाटचाल अधोगतीकडे सुरू आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन ही घोषणा हवेत आहे, हे गेल्या दोन वर्षांत लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होते. मेक इन इंडियाच्या माध्यमातून किती उद्योग आले, किती बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या याचीही आकडेवारी सरकारने जाहीर करण्याची मागणी श्री. पाटील यांनी केली.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने लोकांना जी आश्‍वासने दिली, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. शिवसेनेच्या मंत्र्यांकडे जी खाती आहेत, त्यांच्या कामकाजाबाबत मी समाधानी आहे. कोल्हापूरचा टोल घालवू, एलबीटी रद्द करू हे शिवसेनेचे आश्‍वासन होते आणि आम्ही ते पूर्ण करून दाखवले. मंत्रालयातील दलालांचा सुळसुळाटही थांबवण्यात सरकारला यश आले.
ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधी तोकडा पडत असल्याचे आमदार श्रीमती कुपेकर यांनी सांगितले. महामार्गाच्या धर्तीवरच खेडेगावांतील रस्त्यांचाही विचार व्हावा. आमदारांना मिळणारा दोन कोटींचा निधी कमी आहे, त्यात वाढ होऊन तो किमान पाच कोटी करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची जाण असलेले आहे, असे आमदार सत्यजित पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्‍न मार्गी लागले, असा दावाही त्यांनी केला.

अनेक प्रश्‍न मार्गी
सरकारमुळेच राधानगरी-भुदरगडमधील अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्‍न सुटण्याच्या मार्गावर आहेत, असे आमदार प्रकाश आबीटकर यांनी सांगितले. कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासाठी सरकारने जो 120 कोटींचा निधी दिला, एवढा निधी शिरोळ तालुक्‍याच्या इतिहासात कधी मिळाला नव्हता, त्यातून या भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम झाल्याचे आमदार उल्हास पाटील यांनी सांगितले. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी मानून राज्य व केंद्र सरकारचे काम सुरू आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत दिलेली आश्‍वासने पूर्ण केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असा दावा आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला. अशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनीही व्यक्त केल्या.