आमदार शिवाजी कर्डिले यांनाही अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नगर - आमदार संग्राम जगताप समर्थकांनी शनिवारी (ता. 7) पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले आणि अन्य एक आरोपी अफजल शेख आज सकाळी पोलिसांत हजर झाले. त्यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. 

नगर - आमदार संग्राम जगताप समर्थकांनी शनिवारी (ता. 7) पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले आणि अन्य एक आरोपी अफजल शेख आज सकाळी पोलिसांत हजर झाले. त्यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. 

केडगाव येथे महापालिका प्रभाग 32च्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शनिवारी शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची हत्या झाली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी आमदार जगताप यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांच्या समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केला. त्याबाबत पोलिसांनी सुमारे तीनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून 22 जणांना अटक केली. त्याच गुन्ह्यात आमदार कर्डिले आज सकाळी स्वत: पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. पोलिसांनी त्यांना भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात नेऊन अटकेची कारवाई केली. आरोपी अफजल शेख भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना आज दुपारी न्यायालयात हजर केले. 

आरोपींनी पोलिस अधीक्षक कार्यालयाचा मुख्य दरवाजा तोडून सरकारी कामात अडथळा आणला. पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून दगडफेक केली. कर्डिले भारतीय जनता पक्षाचे राहुरी मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना गुन्ह्यातील तीनशे आरोपींची नावे माहीत असून, त्यांच्याकडे विचारपूस करावयाची आहे. गुन्ह्यात आरोपींनी लाकडी दांडक्‍याचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. ते हस्तगत करायचे आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून थेट पोलिसांवर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणला आहे. त्यामुळे आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी न्यायालयात केली. 

आरोपीतर्फे बाजू मांडताना ऍड. महेश तवले म्हणाले, की आमदार कर्डिले यांना विनाकारण या गुन्ह्यात गोवले आहे. प्रथमवर्ग न्यायाधीश एस. डी. पाटील यांनी आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ज्योती लक्का यांनी बाजू मांडली. 

कळमकर चुलत्या-पुतण्यासह अन्य पसार 
पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी माजी आमदार दादा कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक कुमार वाकळे पसार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर आहेत.

Web Title: MLA Shivaji Kardile was also arrested