साडेआठ लाख कोटींचा कर्जघोटाळा मोदींनी दडपला - सीताराम येचुरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

सांगली - ‘टू-जी स्पेक्‍ट्रम‘ आणि कोळसा गैरव्यवहारापेक्षा बड्या उद्योजकांचा कर्जघोटाळा कैक पट मोठा आहे. त्यांच्या साडेआठ लाख कोटी रुपयांच्या कर्जाला सूट देऊन देशाला खड्ड्यात घालण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत. सोमवार (ता. 18) पासून सुरू होणाऱ्या लोकसभा अधिवेशनात मोदींच्या बगलेतील या उद्योजकांची नावे आणि त्यांच्या कर्जाची यादी पटलावर मांडून सरकारला उघडे पाडू, असा घणाघात माकपचे केंद्रीय सचिव, खासदार सीताराम येचुरी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, ‘देशातील कुबेरांनी राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून कर्ज घेतले. त्यांचे उद्योग बुडाले, वसुली झाली नाही. विजय मल्ल्यांसह अनेक बड्या उद्योजकांची यादी आहे. साडेआठ लाख कोटींचे कर्ज थकले आहे. केवळ 10 उद्योजकांकडे सुमारे चार लाख कोटींची थकबाकी आहे. त्यांचे अन्य बडे उद्योग उभे आहेत, त्यातून वसुली का होत नाही? या कर्जाला पूर्ण सूट देण्याची सरकारची मानसिकता आहे. हे सारे मोदींचे स्पॉन्सरर आहेत. त्यांच्यासाठी रिझर्व्ह बॅंकेचा राखीव निधी वापरण्याचा डाव आहे. अशाने सरकारी बॅंका बुडतील. सरकार मूर्खपणा करत असल्यानेच रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन राजीनामा देत आहेत. देशाची अर्थव्यवस्था धोक्‍यात आहे. हा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी मी मोदींना पत्र लिहिलेय. त्याला उत्तर नाही. आता अधिवेशनातच उत्तर मागू.‘‘

येचुरी पुढे म्हणाले, ‘काश्‍मीरमधील तणाव वाढतोय. त्यावर सरकारकडे उत्तर नाही, सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची तयारी नाही. दुसरीकडे उत्तर प्रदेशात मतांसाठी खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जातेय. बजरंग दल शस्त्र प्रशिक्षण शिबिर घेणार असल्याचे जाहीरपणे सांगितले जातेय. निवडणुकीच्या तोंडावर जातीयवाद उफाळावा, हाच उद्देश दिसतोय. या साऱ्या प्रश्‍नांवर आम्ही सरकारला घेरणार आहोत.‘