अविनाश मोहिते यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

कऱ्हाड - तोडणी वाहतूकदारांच्या बनावट कर्जप्रकरणी शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना काल रात्री उशिरा अटक झाली. त्यांना आज येथील फौजदारी न्यायालयात हजर केले असता 18 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश न्यायाधीश एस. एम. पाडोळीकर यांनी दिला. श्री. मोहिते व श्री. पाटील यांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांनी काल फेटाळला होता. 

कऱ्हाड - तोडणी वाहतूकदारांच्या बनावट कर्जप्रकरणी शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना काल रात्री उशिरा अटक झाली. त्यांना आज येथील फौजदारी न्यायालयात हजर केले असता 18 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश न्यायाधीश एस. एम. पाडोळीकर यांनी दिला. श्री. मोहिते व श्री. पाटील यांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांनी काल फेटाळला होता. 

श्री. मोहिते व पाटील यांच्या कार्यकाळात सन 2014-15 च्या गळीत हंगामासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या 784 वाहनधारकांना न घेतलेल्या कर्जापोटी प्रत्येकी सात लाख रुपये अशा एकूण 58 कोटी दोन लाखांच्या परतफेड करण्याच्या नोटिसा बॅंक ऑफ इंडियाकडून पाठविण्यात आल्या होत्या. यापैकीच यशवंत पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांनाही ही नोटीस बजविण्यात आली होती. त्यांनी कारखान्याकडे 2013-14 मध्ये तोडणी वाहतूक करारासाठी ट्रॅक्‍टर-ट्रॉलीचे आरसी बूक, टीसी बूक, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड अशा कागदपत्रांची झेरॉक्‍स दिली होती; पण करारानुसार ठरलेली उचल न दिल्याने वाहतूकदाराने तोडणी वाहतुकीसाठी आपले वाहन लावलेच नाही, तरीही या शेतकऱ्याच्या नावे सात लाख रुपयांचे कर्ज उचलले गेल्याची बाब त्यांना बॅंक ऑफ इंडियाकडून मिळालेल्या नोटिशीनंतर कळाली. ऊसतोडणीसाठी वाहन दिलेले नसताना, तसेच या बॅंकेत खाते नसतानाही सात लाख रुपयांच्या कर्जवसुलीच्या नोटिसा मिळाल्या असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तत्कालीन अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव उत्तमराव पाटील, तत्कालीन अधिकारी व बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने खोट्या सह्या करून कर्ज घेतल्याची फिर्याद त्यांनी पोलिस ठाण्यात दिली. 

श्री. मोहिते यांच्यासह दोघांचा अटकपूर्व जामीन काल फेटाळल्यानंतर आज त्यांना अटक झाली. दुपारी चारच्या सुमारास त्यांना न्यायालयात आणण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. गुंडे यांनी बाजू मांडली. बॅंक, कृष्णा कारखाना व शेतकी संघ यांनी संगनमताने बनावट कर्ज प्रकरण केले आहे, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संशयितांना पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. बचाव पक्षातर्फे ऍड. एम. टी. यादव यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, ""तक्रारीमध्ये ज्या रकमेचा गैरव्यवहार झाला आहे, असे नमूद केले आहे, ती रक्कम बॅंकेत शिल्लक आहे. मात्र, त्या रकमेचा बॅंकेने कशा प्रकारे व्यवहार केला आहे, याचा शोध व्हायला पाहिजे. त्यासाठी एकटे तत्कालीन अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील दोषी नाहीत. बॅंकेचा व्यवहार तपासण्याची प्रक्रिया पोलिसांनी करावी. त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या कागदपत्रांवर तपास होऊ शकतो. त्यामुळे संबंधितांना जामीन मिळावा.'' दोन्ही युक्तिवादानंतर न्या. पाडोळीकर यांनी 18 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Web Title: Mohini Avinash arrested