‘मोका’चा साधला मोका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यात काम करताना अधिकाऱ्यांवर दडपण असते; परंतु अशा दडपणाला भीक न घालता कर्तव्यावर कसे लक्ष केंद्रित करता येते व जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगता येते याची प्रचिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या कार्यपद्धतीमधून दिसून आली आहे.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यात काम करताना अधिकाऱ्यांवर दडपण असते; परंतु अशा दडपणाला भीक न घालता कर्तव्यावर कसे लक्ष केंद्रित करता येते व जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगता येते याची प्रचिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या कार्यपद्धतीमधून दिसून आली आहे.

गुन्हेगारांची नांगी वेळीच ठेचली तर त्याची वळवळ थांबते. ‘पुढच्यास ठेच... मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे गुन्हेगारीची पिलावळ देखील थंडावते. गुन्हेगार हा गुन्हा करतच असतो. त्याला फक्त कायद्याच्या कचाट्यात पकडण्याची संधी शोधत राहिली पाहिजे. सध्याचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पाच महिन्यात एक-दोन नव्हे, चार टोळ्यांतील २७ जणांना ‘मोका’ लावण्याचा मोका साधला आहे. २७ जणांना मोका लावून सहा जणांना झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार वर्षासाठी स्थानबद्ध केले.

सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी पाहिली तर ती नेहमीच चर्चेत असते. अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे येथे घडतात. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यात काम करताना अधिकाऱ्यांवर दडपण असते; परंतु दडपण झुगारून देऊन ‘पोलिसिंग’ केले तर जनतेच्या मनात स्थान मिळवताही येते. चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग, खून यांसारखे गुन्हे घडत असताना बऱ्याच पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अपयशी ठरत आहेत; तर एलसीबी, गुंडाविरोधी पथक कारवाईचा फलक हलता ठेवण्यासाठी धडपड करत आहेत.

पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सहा महिन्यांपूर्वीच जिल्ह्याचा पदभार घेतला. डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी मोठे प्रयत्न केले. तसेच गणेश मंडळांनी डॉल्बीला फाटा देत ती रक्कम जलयुक्तशिवारसाठी पोलिसांकडे दिली. २८ लाखांचा निधी संकलित करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. ‘निर्भया’ सायकल रॅली जिल्ह्यात पूर्ण केली. तसेच गुन्हेगारांना कायद्याच्या पकडण्यासाठी पाच महिन्यांत चार टोळ्यांतील २७ जणांना ‘मोका’ लावला. ६ गुन्हेगारांना वर्षासाठी स्थानबद्ध केले. जिल्हा पोलिस दलाचे ‘कॅप्टन’ गड सांभाळत धडाकेबाज कारवाई करताना काही पोलिस ठाण्यातील शिलेदारांनाही आता धडाकेबाज कामगिरी करून जिल्हा भयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. ‘कॅप्टन’प्रमाणेच काम करून जिल्ह्याचा वेगळा आदर्श राज्यासमोर उभा करण्याची आवश्‍यकता आहे.

Web Title: mokka