विजेच्या धक्क्याने निकामी झाला वानराचा हात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

जखमी वानरास वन विभागाने उपचारासाठी प्राणी संग्रहालयात दाखल केले होते. पण तिथे त्यास आवश्‍यक असणारे उपचार मिळाले नव्हते. ही बाब वन्यजीव प्रेमी मुकुंद शेटे यांना समजली. त्यांनी तत्काळ पशू वैद्यकीय दवाखान्याचे डॉ. विश्‍वजित बडगिरे व अॅनिमल राहत संस्थाचे डॉ. राकेश चित्तोड यांना संपर्क केला.

सोलापूर - विजेचा धक्का बसून उत्तर सोलापूर तालुक्‍यातील बीबी दारफळ परिसरात वानराचा उजवा हात पूर्णपणे निकामी झाला. बांधलेल्या दोरीमुळे त्याचा गळाही कापला गेला होता. सोमवारी वन्यजीव मित्रांच्या पुढाकारातून जिल्हा पशू दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. 

जखमी वानरास वन विभागाने उपचारासाठी प्राणी संग्रहालयात दाखल केले होते. पण तिथे त्यास आवश्‍यक असणारे उपचार मिळाले नव्हते. ही बाब वन्यजीव प्रेमी मुकुंद शेटे यांना समजली. त्यांनी तत्काळ पशू वैद्यकीय दवाखान्याचे डॉ. विश्‍वजित बडगिरे व अॅनिमल राहत संस्थाचे डॉ. राकेश चित्तोड यांना संपर्क केला. वानरावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे समजले. सोलापूर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव यांना घटनेचे गांभीर्य समजल्यानंतर शस्त्रक्रियेची परवानगी दिली. सोमवारी सकाळी जिल्हा पशू दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉ. बडगिरे व डॉ. चित्तोड यांनी वानरास भूल देऊन शस्त्रक्रियेला सुरवात केली. गॅंगरीन होऊ नये म्हणून वानराचा उजवा हात मनगटापासून कापावा लागला. गळ्याभोवती असलेली दोरी आतमध्ये घुसली होती. ती व्यवस्थित बाहेर काढण्यात आली. जवळपास पन्नास मिनिटे ही शस्त्रक्रिया चालली. दुपारी दोन वाजता वानर पूर्णपणे शुद्धीवर आले. शुद्धीवर येताच वानराने खाद्य खाण्यास सुरू केली. यावेळी वन विभागाचे वनरक्षक राजेंद्र बनसोडे, वन्यजीव प्रेमी मुकुंद शेटे, प्रवीण जेऊरे, नकीनंदन जंगम, अॅनिमल राहतचे भीमाशंकर विजापुरे उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: A monkey has lost his hand due to electric shock