आईनं मनुष्यातच देव पाहायला शिकवलं! - सई परांजपे

आईनं मनुष्यातच देव पाहायला शिकवलं! - सई परांजपे

कोल्हापूर - ‘‘माझं बालपण चारचौघांसारखं निश्‍चितच नव्हतं. वडील रशियन. आई शकुंतला ही प्रचंड बुद्धिमान, लहरी, मनस्वी, काहीशी अतिरेकी स्वभावाची होती. चांगले वळण लागण्यासाठी खूप मारतही असे. छप्पर फाडके लाडही करायची. आमच्या घरी देव्हारा नव्हता, देव नव्हते; पण आजोबा रॅंग्लर परांजपे ऊर्फ आप्पांनी आणि आईनं मला मनुष्यातील देव पाहायला शिकविलं. मी घडले ते आईमुळे. आईचा माझ्या आयुष्यावर मोठा प्रभाव आहे. आईमुळेच मी नाटकाचा पहिला धडा गिरविला. गोष्टी जुळवून सांगण्याच्या माझ्या हातोटीमुळे आईनं माझ्या कल्पनाशक्तीला खतपाणी घातलं. वयाच्या आठव्या वर्षी ‘मुलांचा मेवा’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं. तेव्हापासून मी लिहू लागले. माझ्या आयुष्याचा पुढील मार्गही ठरला,’’ अशी आई-लेकीच्या नात्याची उकल प्रसिद्ध नाटककार, चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांनी केली. 

न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांच्या हस्ते सई परांजपे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले. मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी अभिनेता, दिग्दर्शक हृषीकेश जोशी यांनी परांजपे यांची प्रकट मुलाखत घेतली. राम गणेश गडकरी हॉलमध्ये कार्यक्रम झाला. तत्पूर्वी, न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित सी. जी. कुलकर्णी वाङ्‌मय मंडळ, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्या सहयोगाने सई परांजपे यांच्या ‘सय माझा कलाप्रवास’ या आत्मकथनाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ. राजन गवस यांच्या हस्ते झाले. 

डॉ. गवस म्हणाले, ‘‘सई परांजपे हे समृद्ध विद्यापीठ आहे. या विद्यापीठानं आमचं जगणं समृद्ध केलं. त्यांच्याबरोबर एखादा श्‍वास घेणं हे आयुष्यातील भाग्य असते. हे भाग्य आम्हाला लाभलं. त्यांचे हे आत्मकथन प्रकाशित करण्याचा माझ्या आयुष्यातील आजचा महत्त्वाचा प्रसंग आहे. या ग्रंथाला स्पर्श करण्याने अनेकांचे आयुष्य उजळून निघेल, म्हणूनच प्रत्येकाने या आत्मकथनाचा मनसोक्त आस्वाद घ्यावा.’’ 

परांजपे म्हणाल्या, ‘‘आप्पांकडून मी गणिताचा वारसा घेतला नाही. माझे आणि गणिताचे कधीही जमले नाही; पण चांगल्या कल्पनाशक्तीमुळे मी दररोज दोन ते तीन पाने लिहू लागले. आईनं प्रोत्साहन दिलं. संस्कृतही शिकले. यामुळे फ्रेंच, रशियन, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविले. उच्चार स्पष्ट झाले. याचा फायदा आकाशवाणीतील नोकरीत असताना झाला. मुलांसाठी नाटकं लिहिली. बालोद्यान कार्यक्रमात ताई म्हणून भाग घेतला. गोपीनाथ तळवलकर, बा. भ. बोरकर, व्यंकटेश माडगूळकरांकडून अनेक गोष्टी शिकले. ‘बेडूकवाडी’वर मी नभोनाट्य सादरीकरण केले. ‘पक्ष्यांचे कविसंमेलन’ हे पहिले नाटक लिहिले. अनेक नाटकं ‘मौज’ने प्रकाशित केली. पुढे एनएसडीत गेले. इथे इब्राहिम अल्काझींकडून शिकायला मिळाले. त्यांचाही माझ्या आयुष्यावर प्रभाव आहे.’’ 

स्नेहा फडणीस, सागर बगाडे यांनी सूत्रसंचालन केले. फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट यांनी मानपत्राचे वाचन केले. श्री. लोहिया यांनी प्रास्ताविक केले. नितीन वाडीकर, एस. के. कुलकर्णी, पी. एस. हेरवाडे, चंद्रकांत जोशी, डॉ. प्रकाश गुणे, पद्माकर सप्रे, प्राचार्य एस. एस. चव्हाण, प्राचार्य प्राची घोलप, के. ई. पवार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com