"स्वाभिमानी'तून फुटलेल्यांना भाजपात नेण्याच्या हालचाली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

सांगली - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या भाजपप्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी होती, ते भाजपमध्ये जाणार, याची कल्पना आली होती, असा सूर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून उमटला. सदाभाऊंनी संघटनेतील समर्थकांसह राज्यात काही वर्षांत "स्वाभिमानी'ला रामराम ठोकून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांना आपल्यासोबत भाजपमध्ये नेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांचे चिरंजीव सागर खोत यांनी मराठवाड्यात संपर्क मोहिमेची तयारी केली आहे. समर्थक, हितचिंतकांशी चर्चेनंतर मी बोलेन, असा पवित्रा सदाभाऊंनी घेतला आहे. 

आत्मक्‍लेश यात्रेच्या तोंडावरच सदाभाऊंच्या भाजपप्रवेशाचे वृत्त समोर आल्याने संघटनेत खळबळ माजली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूर दौऱ्यासाठी 29 मे रोजीची तारीख निश्‍चित केली, याची माहिती राजू शेट्टी यांना नव्हती. त्यामुळे सहयोगी पक्ष "स्वाभिमानी'ला वगळूनच "कार्यक्रम' करण्याची भाजपची तयारी पूर्ण झाल्याचे संकेत संघटनेला मिळाले. दरम्यान, सदाभाऊंनी 29 मे रोजीच्या कार्यक्रमासाठीच्या तयारीला वेग देत कार्यक्रमाची आखणी सुरू केली आहे. या समारंभापूर्वी समर्थकांसह त्यांची बैठक होणार आहे. त्यात ते भविष्यातील वाटचालीविषयी विचारविनिमय करणार आहेत. त्याचवेळी सागर यांच्यावर राज्यातील "स्वाभिमानी'च्या जुन्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, काही नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह वाळवा तालुक्‍यातील दोन बड्या राजकीय घराण्यातील युवा नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलणी सुरू आहेत. त्यांनी तूर्त "मौन' धारण केले आहे. 

शेट्टी-खोत फोन नाहीच 
सदाभाऊ खोत भाजपमध्ये जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होऊन राज्यभर चर्चेला उधाण आल्यानंतरही या दोन्ही नेत्यांनी दिवसभरात एकमेकांशी संपर्क साधला नाही, अशी खात्रीशीर माहिती आहे. शेट्टी यांनी सदाभाऊंकडे "हे खरंय का?' याची विचारणा केली नाही किंवा सदाभाऊंनी सोमवारपासून सुरू होत असलेल्या आत्मक्‍लेश पदयात्रेच्या तयारीबाबत शेट्टींकडे विचारपूस केली नाही.