'वसंतदादा' भाडेतत्त्वाने द्यायच्या हालचाली

'वसंतदादा' भाडेतत्त्वाने द्यायच्या हालचाली

सांगली - येथील वसंतदादा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वाने द्यायच्या हालचाली सध्या गतीने सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून विविध कारखाना प्रशासनांशी बोलणी झाल्यानंतर या चर्चेत आता माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या व्यंकटेश्‍वरा ग्रुपचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. अध्यक्ष विशाल पाटील यांनी त्या दृष्टीने प्रशासकीय निरवानिरव सुरू केली आहे.

कारखाना भाड्याने द्यायच्या प्रस्तावाबाबत यापूर्वी बऱ्याचदा चर्चा झाली आहे. देणी भागवण्यासाठी कारखान्याच्या विविध मालमत्तांची विक्रीही यापूर्वी झाली आहे. अगदी कारखाना परिसरातील जागेच्या लिलावाची प्रक्रिया मागणीअभावी पूर्ण झाली नाही. गतवर्षी जिल्हा बॅंकेची देणी भागवून कारखाना एनपीएमधून बाहेर काढण्यात यशही आले; मात्र यंदा ऊसटंचाईच्या गर्तेत कारखाना अवघा चाळीस दिवसही चालू शकला नाही. साठ-सत्तर हजार टन गाळप झाले आणि कारखाना बंद पडला. या पार्श्‍वभूमीवर कारखाना सक्षम व्यवस्थापनाकडे सोपवावा, असा अंतिम निर्णय संचालक मंडळाने आपल्या पातळीवर घेतल्याचे समजते. प्रारंभी अथणी शुगर्सचे नाव चर्चेत होते. श्रीमंत पाटील यांनी त्यांची युनिटस्‌ सक्षमपणे चालवताना कोल्हापूर जिल्ह्यातील बंद पडलेला इंदिरा कारखानाही नुकताच खरेदी केला आहे; मात्र त्यांचा प्रस्ताव आता मागे पडला आहे. सध्या महाडिकांच्या व्यंकटेश्‍वरा कारखान्याचे नाव अधिक चर्चेत आहे.

सभासदांनी वार्षिक सभेत यापूर्वी कारखाना भाड्याने द्यायची मागणी केली आहे. निविदा प्रक्रियेत चांगले कारखानदार पुढे यावेत यासाठी ही चर्चा आहे. ती सभासदांपुढे मांडू. त्यांची संमती असेल तर पुढे जाऊ.
-अध्यक्ष, विशाल पाटील

कोणताही प्रस्ताव कार्यालयाकडे सादर झालेला नाही.
- श्री. रावळ, प्रादेशिक साखर सहसंचालक

सर्व तयारी कारखाना प्रशासनाकडून सुरू असून, कामगार व शेतकऱ्यांची देणी आधी दिल्याशिवाय अशा कोणत्याही निर्णयाला आमचा तीव्र विरोध राहील.
- सुनील फराटे, शेतकरी संघटनेचे नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com