साताऱ्यात लवकरच मल्टिप्लेक्‍स

साताऱ्यात लवकरच मल्टिप्लेक्‍स

सातारा - चांगली चित्रपटगृहे नाहीत, या सबबीखाली चित्रपटरसिकांनी चित्रपटगृहांकडे पाठ केली, अशी वदंता आहे. या चित्रपट रसिकांसाठी एक शूभवार्ता आहे. साताऱ्यात ‘पाच स्क्रीन’च्या मल्टिप्लेक्‍सच्या कामाने वेग घेतला असून, येत्या जूनमध्ये ते सातारकर रसिकांच्या सेवेत दाखल होत आहे. एकापाठोपाठ एक चित्रपटगृहे बंद होत असताना मुख्य बस स्थानकासारख्या मध्यवर्ती ठिकाणी  एकाच इमारतीत, एकाच वेळी पाच चित्रपटांचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने चित्रपटरसिकांना दिलासा देणारी बाब ठरली आहे. 

जयविजय, राधिका पाठोपाठ ‘समर्थ’ हे सहावे चित्रपटगृह बंद पडल्याने साताऱ्यात ‘राजलक्ष्मी’ हे एकमेव चित्रपटगृह राहिले आहे. एकापाठोपाठ एक चित्रपटगृह बंद पडण्याची मालिका गेल्या काही वर्षांत साताऱ्यात सुरू असताना चित्रपट रसिकांना दिलासा देणारी एक बातमी येऊन ‘सकाळ’ कार्यालयात थडकली आहे. जिल्ह्यातील पहिलंवहिलं मल्टिप्लेक्‍स साताऱ्यात साकारत आहे. टुरिंग टॉकीजबरोबरच गावोगावी निमित्ताने पडद्यावर दाखवले जाणारे चित्रपट, सुसज्ज चित्रपटगृहे आणि आता बहुपर्यायी रूपेरी पडद्यांच्या ‘मल्टिप्लेक्‍स’च्या दिशेने चित्रपटांचा प्रवास सुरू राहणार आहे. 

राज्य मार्ग परिवहन विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयापुढे ‘सेव्हन स्टार’ हे बहुउद्देशीय संकुल आर्किटेक्‍ट महेंद्र चव्हाण यांनी विकसित केले आहे. याच इमारतीत हे मल्टिप्लेक्‍स आहे. ‘एस टीव्ही’ या कंपनीची गुजरातपासून दक्षिणेतील राज्यांमध्ये सुमारे ३०० स्क्रीन चालविली जातात. हीच कंपनी ‘सेव्हन स्टार’ मल्टिप्लेक्‍सचे व्यवस्थापन पाहणार आहे. 

या मल्टिप्लेक्‍सबाबत ‘सकाळ’शी बोलताना महेंद्र चव्हाण यांनी सांगितले, ‘२९० आसन क्षमता असलेली तीन व शंभर आणि ७० आसन क्षमतेची प्रत्येकी एक अशी पाच चित्रटगृहे त्यामध्ये असतील. एकाच ठिकाणी पाच चित्रपटांचा पर्याय प्रेक्षकांपुढे असणार आहे. त्यामुळे रसिकांना निवडीला वाव आहे. ७० प्रेक्षक बसतील अशा चित्रपटगृहात आरामशीर, तिरकं झोपून सिनेमा पाहता येईल, अशी आसनांची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली आहे. १०० आसन क्षमतेच्या चित्रपटगृहात खुर्च्यांऐवजी बसण्यासाठी ऐसपैस सोफे असणार आहेत. २९० आसन क्षमतेची उर्वरित तीन स्क्रीन आरामशीर खुर्च्यांची असतील.’’

ही पाचही चित्रपटगृहे वातानुकूलित असतील. चित्रपटरसिकांना एक चांगल्या दर्जाची मनोरंजनाची सोय उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. जूनमध्ये सेव्हनस्टार मल्टिप्लेक्‍स सातारकरांच्या सेवेत रुजू होईल.
- महेंद्र चव्हाण, विकसक, सेव्हन स्टार मल्टिप्लेक्‍स.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com