भारत-पाक युद्धातील हुतात्मा पत्नीची फरपट

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 जुलै 2017

बळकावलेली म्हाडा सदनिका मिळण्यासाठी मंत्रालयात खेटे

बळकावलेली म्हाडा सदनिका मिळण्यासाठी मंत्रालयात खेटे
मुंबई - 1965 च्या भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात हुतात्मा झालेल्या जवानाच्या पत्नीची अक्षरशः फरपट सुरू आहे. शहीद कोट्यातून मिळालेले म्हाडाचे बळकावले घर परत मिळण्यासाठी या वृद्ध वीरपत्नीने मंत्रालयाचे उंबरठे झिजवण्यास सुरवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

सातारा जिल्ह्याच्या कामेरी गावातील अर्जुन पांडुरंग जाधव लष्करात होते. 1965 मध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात ते हुतात्मा झाले. त्यांच्या पत्नी बबई अर्जुन जाधव गेल्या 73 वर्षांपासून कामेरी या मूळ गावात मुलगी आणि जावई यांच्यासोबत वास्तव्यास आहे. सन 2009 मध्ये म्हाडाने मुंबईत काढलेल्या सदनिका लॉटरीमध्ये शहीद कोट्यातून बबई जाधव यांना घर मंजूर झाले. यासाठी आवश्‍यक कागदपत्रे त्यांनी म्हाडाकडे जमा केली. म्हाडाकडून त्यांना देकार पत्रासह दहिसर पूर्व येथील शैलेंद्र नगरच्या इमारतीतील सदनिकेची चावी देण्यात आली. त्यानंतर श्रीमती जाधव मूळ गावी गेल्या असता एका व्यक्‍तीने त्यांची भेट घेतली. म्हाडाच्या घरासाठी आणखी काही कागदपत्रे आवश्‍यक असल्याचे सांगून मुबईला येण्याचा निरोप दिला. संबंधित व्यक्‍तीने त्यांच्यासाठी खास वाहनाची व्यवस्था केली.

बबई जाधव दहिसर पूर्व येथील संबंधित इमारतीत गेल्यावर त्या व्यक्तीने त्यांच्याकडून म्हाडाचे देकार पत्र आणि चावी घेतली. त्यानंतर काही कागदपत्रांवर सही घेऊन पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. बबई जाधव अशिक्षित असल्याने त्या व्यक्‍तीवर त्यांनी विश्‍वास ठेवला. कालांतराने संबंधित व्यक्‍तीचा संपर्क होत नसल्याने त्यांनी दहिसर गाठले. त्या वेळी मिळालेल्या म्हाडाच्या घरात अन्य कुटुंब राहत असल्याने त्यांना धक्‍का बसला. यावर बबई जाधव यांनी न्यायासाठी म्हाडा कार्यालयात खेटे घातले. मात्र, त्यांना कुणीही दाद दिली नाही. गेल्या सात वर्षांपासून बळकावले गेलेले घर मिळण्यासाठी श्रीमती जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे तक्रार अर्ज दिले. शिवतारे यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.