तरुणाईच्या ताकदीने सांगली ‘स्मार्ट’ करू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

सांगली - आपलं शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यायला हवा. त्यांच्या ताकदीनेच आपली सांगली स्मार्ट करू, असा आशावाद महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी आज येथे व्यक्त केला.

सांगली - आपलं शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यायला हवा. त्यांच्या ताकदीनेच आपली सांगली स्मार्ट करू, असा आशावाद महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी आज येथे व्यक्त केला.

सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियानविषयी कार्यशाळा झाली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. खेबुडकर बोलत होते. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. कोडग यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरे हागणदारीमुक्त व स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने व्यापक प्रसिद्धी आणि उपक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा झाली.

श्री. खेबुडकर म्हणाले, ‘‘आपण कचरा करतो आणि महापालिकेला दोष देतो. मुळात साडेपाच लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरात कचरा उठाव करण्यासाठी उपलब्ध कर्मचारी पुरेसे नाहीत. यासाठी आपल्यामध्येच सकारात्मकता निर्माण व्हायला हवी. ‘मी कचरा करणार नाही, इतरांना करू देणार नाही’, अशी भूमिका सर्वांची हवी. केंद्र सरकारने राबवलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात सांगली महापालिका ताकदीने प्रयत्न करत आहे. त्यामुळेच अपवाद वगळता सर्वच प्रभाग आपण हागणदारीमुक्त करू शकलो. शौचालये बांधण्यासाठी सुमारे तीन कोटींचा निधी नागरिकांना दिला. ही सकारात्मक बाब असली तरी कचऱ्याचे वाढते प्रमाण कायम आहे. ते कसे कमी होईल, त्यापासून खतनिर्मिती करता येईल का, याचा विचार करायला हवा. शहरातील तरुणाईच्या ताकदीने आपण शहर स्वच्छ ठेवू. त्यात यशस्वी झालो तर स्मार्ट सिटी करायला वेळ लागणार नाही. यासाठी आपल्या महापालिकेला तरुणाईची साथ हवी आहे.’’

श्री. जोशी म्हणाले, ‘‘युवकांच्या ताकदीने देश महासत्तेकडे पावले टाकतोय. त्यांना विधायक वाट दाखवण्यासाठीच ‘यिन’ चळवळीची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून समाजात विधायक कामे घडवून आणली जातात. स्वच्छता अभियानातही ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे. सांगलीतही महापालिकेला ‘सकाळ’चे विशेष योगदान राहील, आणि तरुणाईच्या जोरावर शहर स्मार्ट बनवण्यासाठी प्रयत्नही सुरू राहतील.’’

महापालिकेच्या तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी नकुल जकाते यांनी ‘स्वच्छ भारत ॲप’ची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

स्वच्छ अभियानात महाविद्यालयाचे महापालिकेला पूर्णतः सहकार्य राहील, अशी ग्वाही प्राचार्य कोडग यांनी दिली. यिन समन्वयक विवेक पवार यांनी संयोजन केले. यावेळी डॉ. पी. एन. गोरे, प्रा. महावीर पाटील उपस्थित होते. प्रा. पी. बी. पाटील यांनी आभार मानले.

सांगली राज्यात प्रथम  
‘स्वच्छता ॲप’चा उपक्रम केंद्र सरकारकडून राबवला जात आहे. देशभरातील ५०० शहरे यात जोडली गेली आहेत. किती नागरिकांनी या ॲपचा वापर केला यावरही महापालिकेला गुण प्राप्त होतात. या ॲपवर स्वच्छता किंवा कचऱ्याचे फोटो टाकल्यास १२ तासांत निपटारा केला तरही गुण वाढतात. यामुळे देशात १८ वे स्थान, तर राज्यात प्रथम स्थान सांगलीने मिळवले आहे. ही बाब आशादायी असल्याचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले.  

ॲप कसे डाऊनलोड कराल...
* प्ले स्टोअर ओपन करा.
* Swachhata-moud टाइप करा.
* येणारे पहिलेच ॲप डाऊनलोड करा.
* त्यात आपला मोबाईल नंबर टाका.
* ओटीपी मिळाल्यानंतर ॲप सुरू होईल.
* कचऱ्याचे फोटो, कचऱ्याची ठिकाणे, फोटो काढून शेअर करा.
* १२ तासांच्या आत त्याचा निपटारा केला जाईल.

Web Title: Municipal Commissioner Ravindra khebudkar