सांगलीत रस्ते हस्तांतरणाच्या ठरावावरून निषेध-धिक्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

महापालिकेवर पायताण मोर्चा काढून ठराविक टोळक्‍याने लोकनियुक्त नगरसेवकांची नव्हे तर समस्त नागरिकांची बदनामी केली असून त्याबद्दल आजची महासभाच 23 मे पर्यंत तहकूब करण्यात आली. धिक्कार, निषेध, घोषणाबाजी, फटाके असा एकूणच आजचा महासभेचा माहौल होता. 

सांगली - दारु दुकानांसाठी रस्ते हस्तांतरणाच्या संभाव्य ठरावावरून महापालिका क्षेत्रात पेटलेले रान आज तुर्त थंडावले. नसलेल्या विषयावरून रान पेटवून नगरसेवकांची, महापालिकेची बदनामी केल्याबद्दल स्वाभीमानी आघाडी व उपमहापौर गटाचा निषेध नोंदवत आज कॉंग्रेस-राष्ट्रवादीने निषेध नोंदवला.

महापालिकेवर पायताण मोर्चा काढून ठराविक टोळक्‍याने लोकनियुक्त नगरसेवकांची नव्हे तर समस्त नागरिकांची बदनामी केली असून त्याबद्दल आजची महासभाच 23 मे पर्यंत तहकूब करण्यात आली. धिक्कार, निषेध, घोषणाबाजी, फटाके असा एकूणच आजचा महासभेचा माहौल होता. 

सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील दारु दुकाने हटवण्याचे आदेश दिल्यानंतर हा वाद पेटला आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त हस्तांतरणाची पळवाट शोधली. त्यासाठी महापालिकेकडून ठराव अपेक्षित होता. असा ठराव करावा यासाठी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची खासदार संजय पाटील यांनी भेट घेतल्याची चर्चा सुरु झाली. त्यावर खासदारांनी मी यासाठी नव्हे तर शेरीनाल्याच्या प्रश्‍नासाठी महापालिकेत आलो होतो असा खुलासा करताना माझा अशा ठरावाला वैयक्तीक विरोध असल्याचे सांगितले. त्यानंतर हा वाद पेटला, उपमहापौर गट व स्वाभीमानी आघाडीने या विषयावर पथनाट्य,मोर्चे, उपोषण, बैठका या विविध मार्गाने प्रबोधन सुरु केले. त्यामुळे पडद्याआड सुरु असलेल्या रस्ते हस्तांतरणाच्या चर्चेला ब्रेक लागला. प्रत्येक जण बचावच्या पवित्र्यात गेला. या मुद्यावर आजवर सर्वच नेत्यांनी विरोध केला आहे. असा कोणताही विषय महासभेच्या आजच्या अजेंड्यावर नव्हता मात्र चर्चा सुरु राहिली ती याच मुद्यावर. 

आज सकाळी चार पाचशे महिला-नागरिकांनी महासभेआधी महापालिकेच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारला होता. दारु समर्थक नगरसेवकांना जोड्याने मारा असा धिक्कार करीतच महिलांनी प्रवेशद्वार रोखले होते. त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांचा महासभेत पारा न चढला. त्यातच सभेच्या प्रारंभीच गौतम पवार यांनी असा काही रस्ते हस्तांतरण करणार नाही असा ठराव करावा अशी मागणी केली आणि सभेतच वादाला तोंड फुटले. असा मोर्चा म्हणजे शहराच्या आजवरच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारा असल्याचा आरोप सर्वच नगरसेवकांनी केला. दिग्विजय सूर्यवंशी, मैन्नुद्दीन बागवान, संतोष पाटील, अनारकली कुरणे, विवेक कांबळे, संजय मेंढे, धनपाल खोत, युवराज गायकवाड, राजू गवळी, युवराज बावडेकर अशा सर्वच नगरसेवकांनी उपमहापौर गटाचे नेते शेखर माने व स्वाभीमानी आघाडीचे नेते गौतम पवार यांच्याकडून स्टंटबाजी सुरु असून केवळ प्रसिध्दीसाठी असे उद्योग सुरु आहेत असा आरोप करीत धारेवर धरले.

त्यानंतर सभा काही होऊच शकली नाही. शेवटी 23 मेपर्यंत सभा तहकूब करून निषेध नोंदवण्यात आला. दोन्हीकडून निषेधाच्या घोषणा देत सभा आटोपली. त्यावेळी आवारात स्वाभीमानी आघाडी व उपमहापौर गटाने फटाके फोडून आनंद व्यक्त केला.