इचलकरंजीतील घडामोडींना वेग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

आघाड्यांसाठी चाचपणी - कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील जांभळे गटाची आघाडी जवळपास निश्‍चित
इचलकरंजी - पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अंतर्गत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीत एकमेकांबरोबर राजकीय आघाडी करण्याबाबत चाचपाणी करण्यात येत आहे. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय जाहीर करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत शहरातील राजकीय चित्र स्पष्ट होईल, असे चिन्हे दिसत आहेत.

आघाड्यांसाठी चाचपणी - कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील जांभळे गटाची आघाडी जवळपास निश्‍चित
इचलकरंजी - पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अंतर्गत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीत एकमेकांबरोबर राजकीय आघाडी करण्याबाबत चाचपाणी करण्यात येत आहे. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय जाहीर करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत शहरातील राजकीय चित्र स्पष्ट होईल, असे चिन्हे दिसत आहेत.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील जांभळे गट यांची आघाडी जवळपास निश्‍चित झाली आहे. एक-दोन जागेवरून वाद निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्याबाबत दोन्ही बाजूंकडून बोलणी सुरू झाली आहे. साधारणपणे 11 जागा जांभळे गटाला कॉंग्रेसकडून सोडण्याची चिन्हे आहेत. या शिवाय राष्ट्रवादीतील कारंडे गटाकडून आज पुढील धोरण ठरविण्याबाब बैठक झाली. यामध्ये मदन कारंडे, विठ्ठल चोपडे, उदयसिंग पाटील व प्रकाश पाटील उपस्थित होते. कोणाबरोबर आघाडी करायची याबाबत त्यांच्याकडून अद्याप निर्णय झाला नाही. सद्य:स्थितीबाबत आमदार हसन मुश्रीफ यांच्याबरोबर चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे श्री. कारंडे यांनी सांगितले.

मॅंचेस्टर आघाडीमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. काही जणांनी शहर विकास आघाडीबरोबर तर काही जणांनी कॉंग्रेसबरोबर युती करण्यावर मत प्रकट केले. त्यामुळे आघाडी करण्याबाबत आज ठोस निर्णय झाला नाही. दोन दिवसांनंतर निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे. भाजपकडून अद्याप उघडपणे हालचाली सुरू झालेल्या नाहीत. मात्र दोन दिवसानंतर त्यांच्याकडूनही उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्‍यता आहे.

आघाड्यांची नोंदणी आणि पर्याय
शहर विकास आघाडी, मॅंचेस्टर आघाडी आणि राजर्षी शाहू आघाडी या तिन्ही आघाड्या सध्याच्या पालिका राजकारणात प्रभावी ठरणार आहेत. मात्र तिन्ही आघाड्यांची निवडणूक आयोगाकडे पूर्णपणे नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या तिन्हा आघाड्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यातून पर्याय शोधण्याचे काम सुुरू झाले आहे. शहर विकास आघाडी ही जिल्ह्यातील एका प्रमुख आघाडीचा आधार घेण्याची चर्चा सुरू झाली आहे.

नगराध्यक्षपदासाठी मुंबईत फिल्डिंग
कॉंग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यासाठी थेट प्रदेश पातळीवरुन फिल्डिंग लावली जात आहे. कॉंग्रेस अंतर्गत दोन गटात मोठी चुरस निर्माण झाली आहे. या दोन्ही गटाचे प्रमुख नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. यातील कोणत्या गटाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे.