प्रचारात उतरणार सर्वधर्मीय फौज

प्रचारात उतरणार सर्वधर्मीय फौज

काँग्रेस - काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्वधर्मीय स्टार प्रचारकांची फौज उतरणार आहे. त्यात प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे, खासदार रजनी पाटील, हर्षवर्धन पाटील, आरिफ खान, माजी केंद्रीय मंत्री गुलामनबी आझाद, खासदार हुसेन दलवाई, आमदार पतंगराव कदम यांच्यासह आंध्र प्रदेशातून मोहनबाबू, त्यांचे अभिनेते-अभिनेत्री मुले-मुली, कर्नाटकातून मंत्री एम. बी. पाटील यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

मराठा समाजाचा प्रभाव असलेल्या प्रभागांत प्रामुख्याने श्री. चव्हाण व श्री. कदम यांच्या सभांचे आयोजन होईल. मुस्लिमबहुल भागात श्री. आझाद यांच्यासह श्री. दलवाई यांच्या सभा होतील. पद्मशाली समाजाची मते आकर्षित करण्यासाठी मोहनबाबू व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सभा होतील. तर शहर उत्तरमधील बहुतांश भागात मंत्री श्री. पाटील यांच्या सभांचे आयोजन करण्यात येईल. दलित वस्त्यांसाठी माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना आणले जाण्याची शक्‍यता आहे. या शिवाय, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे हेही प्रमुख सभांना उपस्थित असणार आहेत.

स्टार मुद्दे...
काँग्रेसने केलेली विकासकामे
नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना झालेला त्रास
सर्वधर्म समभावाचा प्रचार
विडी कामगारांसाठी केलेली कामे, घेतलेले निर्णय
सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या कामामुळेच सोलापूर स्मार्ट सिटी झाली. 

मास्तरांची मुलुखमैदानी तोफ धडाडणार

माकप - हजारोंच्या सभा, मोठे मोर्चे असे बलस्थान असलेल्या व पूर्व भागात आपले अस्तित्व भक्कम राखून ठेवलेल्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने महानगरपालिका निवडणूक प्रचारासाठी बाहेरचा कोणी वक्ता, नेता आणण्यापेक्षा स्थानिक मुलुखमैदान तोफ असलेल्या माजी आमदार नरसय्या आडम यांच्यावरच आपली भिस्त ठेवली आहे. मास्तरांच्या एका आदेशासरशी हजारो महिला अगदी तान्ह्या बाळासह ऊन, पावसाची तमा न बाळगता मोर्चात सहभागी होतात. असे हजोरोंचे मोर्च पाहून प्रशासनही चटदिशी हालते, असा दिग्गज नेता आपल्या पक्षात असताना बाहेरचा नेता का म्हणून इथं आणावा, असा या पार्टीतील कार्यकर्त्यांचा सवाल नक्कीच बिनतोड वाटतो. 

श्री. आडम यांच्यासह जिल्हा सचिव ॲड. एम. एच. शेख, जिल्हा सचिव मंडळ सदस्य सिद्धप्पा कलशेट्टी यांच्याकडेही प्रचाराची सूत्रे असणार आहेत. तरीही समस्त सोलापूरवासीयांना यानिमित्ताने पुन्हा एकदा मास्तरांच्या भाषणाची धडधडती तोफ अनुभवायला मिळणार हे मात्र खरं...!

स्टार मुद्दे...
पाणी गळती रोखून शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा 
वार्षिक पाणीपट्टी कमी करून फक्त दीड हजार करणार 
महापालिकेच्या स्वायत्ततेसाठी एलबीटी लागू करण्याबद्दल शासनाकडे पाठपुरावा 
बेघरांना पंतप्रधान आवास योजनेतून पक्की घरे देऊन पाच वर्षांत शहर झोपडपट्टीमुक्त करणार

दादा तर आहेतच, सुप्रियांचे आकर्षण..!

राष्ट्रवादी काँग्रेस - सोलापूर महापालिकेत असलेले राष्ट्रवादीचे अस्तित्व आणि सत्ता टिकविण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे सोलापूरला सभेसाठी येणार आहेत. मुंडे यांच्या माध्यमातून युवा व ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होणार आहे. युवती व महिलांसाठी खासदार सुळे यांची सोलापुरात सभा होण्याची शक्‍यता आहे. या शिवाय सोलापुरात मुस्लिम व दलित समाज निर्णायक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील मुस्लिम व दलित समाजातील राज्यस्तरीय नेत्यांना बोलविले जाणार आहे. याशिवाय माजी उपमुख्यमंत्री व माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, बार्शीचे आमदार दिलीप सोपल या स्थानिक नेत्यांवरही सोलापूर महापालिकेच्या प्रचाराची जबाबदारी येण्याची शक्‍यता आहे. 

स्टार मुद्दे...
१९९९ पासून महापालिकेत सत्तेत असल्याने झालेला विकास
भविष्यात पिंपरी-चिंचवड व नवी मुंबई महापालिकेप्रमाणे सुविधांचे आश्‍वासन
दोन्ही काँग्रेसच्या आघाडीच्या माध्यमातून ठरलेला जाहीरनामा व अजेंडा
केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारचे आतापर्यंतचे अपयश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com