उन्हाला टाळून सकाळी व सायंकाळी मतदान करण्याला पसंती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

प्रभाग १५, १६, १७ मधील चित्र
या सर्व प्रभागांत मतदानाबाबत उत्सुकता दिसून आली. बऱ्याच जणांनी सकाळी लवकर येऊन मतदान करण्यास पसंती दिल. दुपारनंतर गर्दी ओसरली, तर चारच्या सुमारास पुन्हा मतदारांनी केंद्रावर गर्दी केली होती.

प्रभाग १५, १६, १७ मधील चित्र
या सर्व प्रभागांत मतदानाबाबत उत्सुकता दिसून आली. बऱ्याच जणांनी सकाळी लवकर येऊन मतदान करण्यास पसंती दिल. दुपारनंतर गर्दी ओसरली, तर चारच्या सुमारास पुन्हा मतदारांनी केंद्रावर गर्दी केली होती.
ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे मतदान केले. शास्त्रीनगर, लोधी गल्ली, फॉरेस्ट व कोनापुरे चाळ या परिसरात नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली होती. मतदान केंद्राच्या आत व बाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता. मतदान केलेल्या नागरिकांना जास्त वेळ केंद्राजवळ थांबू दिले नाही. तसेच गर्दी टाळण्यासाठी कार्यकर्ते व नागरिकांना पोलिसांनी सतत सूचना दिल्या.
शास्त्रीनगर परिसरातील बापूजीनगर मराठी प्राथमिक शाळा येथे मतदानासाठी गर्दी दिसून आली. उमेदवारांतर्फे काम पाहणाऱ्या पोलिंग एजंट यांनी तळपत्या उन्हात आपली कामगिरी बजावली. पोलिंग एजंट यांना बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. मनपा कॅम्प शाळेतील मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. मोबाईल ॲप व लॅपटॉपच्या साह्याने नावे शोधून देण्याचे काम या कार्यकर्त्यांनी केले. उन्हाची काहिली लक्षात घेता शीतपेय विक्रेत्यांनी चांगली संधी साधली. कार्यकर्त्यांनी तळपत्या उन्हात थंडगार मठ्ठ्याचा आस्वाद घेतला. 

ठळक घडामोडी 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल शाळेच्या केंद्राबाहेर दोन पक्षांत किरकोळ वाद
छत्रपती शिवाजी महाराज नाईट कॉलेज व सेंट जोसेफ शाळेत मतदारांचा निरुत्साह
झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मतदार यादीत नाव शोधण्यासाठी ॲप व लॅपटॉपचा वापर

मतदारराजा रुसला अन्‌ उमेदवारांना घाम फुटला
लोगो - प्रभाग क्रमांक : १८, १९, २० मधील चित्र

सकाळी आठ ते दहा-साडेदहा वाजेपर्यंत मतदारांची मतदानासाठी असलेली गर्दी पाहून आनंदित झालेले उमेदवार ११ वाजल्यानंतर मात्र पुरते घाबरून गेले होते. ११ नंतर मतदानासाठी नागरिक बाहेर पडत नसल्याने चिंतित झालेल्या उमेदवारांनी आपली यंत्रणा पुन्हा कामाला लावली.

सर्व मतदान केंद्रांवर मंगळवारी मतदान सुरू झाले. अनेक केंद्रांवर मतदार ७.३० पासूनच दाखल होत असल्याची माहिती उमेदवार प्रतिनिधींनी उमेदवारांना देण्यास सुरवात केली होती. त्यामुळे उमेदवार सर्व केंद्रांना भेट देत होते. आपल्या संपर्कातील कोणत्या परिसरातील व्यक्ती मतदानासाठी आल्या आहेत याचा धांडोळा घेत सहकाऱ्यांसमोर समाधान व्यक्त करत होते. परंतु त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. सकाळी ११ वाजल्यापासून मतदारांची गर्दी हळूहळू ओसरू लागली. तशी उमेदवारांची घालमेल सुरू झाली. कार्यकर्त्यांना आदेश सुटले अन्‌ ज्या भागातील मतदान कमी झाले होते अशा भागात कार्यकर्ते घरोघरी फिरू लागले. ओ ताई, ओ मावशी चला मतदानाला..ओ काका तुम्ही अजून केले नाही का मतदान असे संवाद चौकाचौकात ऐकू येऊ लागले.

एकीकडे ऊन वाढत होते तर दुसरीकडे मतदारांची संख्या रोडावली होती. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान केंद्रांच्या बाहेर लॅपटॉप, मोबाईल तसेच मतदार यादी घेऊन उन्हात बसलेले विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी सावलीचा आधार घेत आपले काम सुरू ठेवले. सकाळी यादीत नाव शोधण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या गराड्यात असलेले पक्षांचे कार्यकर्ते निवांत बसून गप्पा मारताना दिसले. राजकारणापुरते असलेले शत्रुत्व बाजूला सारून आपापल्या पक्षाकडून आलेले भोजन कार्यकर्त्यांनी एकत्र बसून घेतले. मतदान केंद्राबाहेर नाव शोधून देण्यासाठी बसलेल्या या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा हास्यविनोद सुरू असताना ज्या कार्यकर्त्यांवर मतदारांना केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी उमेदवारांनी दिली होती असे कार्यकर्ते मात्र चिंताग्रस्त दिसत होते. या कार्यकर्त्यांना ज्येष्ठ कार्यकर्ते खास सोलापुरी स्टाइलमध्ये ‘अबे, गप्पा मारू नका बे....कामं करा’ असा आदेश सोडत होते.

मतदारराजा रूसल्याने उमेदवार पुरते घाबरून गेले होते. उमेदवारांनी प्रभागातील कार्यकर्त्यांना पुन्हा कामाला लावले आणि दुपारपर्यंत ज्या परिसरातील मतदान प्रयत्न करूनही झालेले नाही अशा भागात लक्ष केंद्रित करून तेथील मतदारांना घराबाहेर काढण्याचे काम कार्यकर्त्यांनी सुरू केले. कोणी रिक्षातून तर कोणी दुचाकीवरून मतदारांना केंद्रापर्यंत आणून सोडत होता. केंद्रापर्यंत मतदारासोबत जाऊन त्यांच्या कानात हळूच आपल्या उमेदवारालाच मतदान करण्याचा आग्रहही करण्यात येत होता. शेवटच्या टप्प्यात दुपारी चारनंतर पुन्हा मतदारांची गर्दी वाढू लागली. सायंकाळी ५.३० पर्यंत अनेक मतदान केंद्रांवर पुन्हा रांगा दिसू लागल्या. अचानक एखादे नाव आठवल्यानंतर शेवटच्या पाच-दहा मिनिटांत पळापळ सुरू झाली. संबंधित मतदाराला आणून मतदान करून घेतल्यानंतर कार्यकर्ते सुटकेचा निःश्‍वास सोडत होते. सायंकाळी मात्र उमेदवारांचा तणाव काहीसा हलका झाला.

ठळक घडामोडी
अनेक मतदान केंद्रांवर वादावादी
उमेदवारांचा मतदान केंद्रांवर ठिय्या
नाव न मिळाल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांत वाद
पोलिसांचा कडक बंदोबस्त

Web Title: municipal election solapur