मार्चअखेरीस निधी खर्चाची लगबग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

‘नियोजन’चा ९२ टक्के खर्च; आमदारांचा निधी २६.३३ कोटींवर

सातारा - जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यातील ९२ टक्के निधी मार्चअखेरीस खर्च झाला आहे. आमदार, डोंगरी निधी पूर्ण खर्च झाला आहे, तर खासदार निधी ९८ टक्के खर्च झाला आहे. वर्षभरात बाहेरच्या जिल्ह्यातील खासदारांकडून साडेतीन कोटी, तर साताऱ्यासह बाहेरच्या आमदारांकडून एकूण २६ कोटी ३३ लाख रुपये जिल्ह्याला उपलब्ध झाले आहेत.

२०१६-१७ साठी जिल्हा वार्षिक योजना २६१ कोटींची होती. या सर्व निधींतून विविध कामांना शंभर टक्के मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी मार्चअखेरपर्यंत २४० कोटी रुपये खर्च झाले आहेत. एका आमदाराला वर्षाला दोन कोटी, तर खासदारांना पाच कोटी रुपये निधी मिळतो. यापैकी विधानसभेच्या आठ आमदारांचा १६ कोटी रुपये निधी वर्षात शंभर टक्के खर्च झाला आहे. तर, खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाच कोटी निधीतून आठ कोटींची कामे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी ९८ टक्के निधी खर्च झाला आहे. डोंगरी विकासांतर्गत जिल्ह्याला गटनिहाय एक कोटी निधी उपलब्ध होतो. हा निधी जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला जातो. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत हा निधी पूर्ण खर्च होणार आहे.

विधानपरिषदेच्या आमदारांपैकी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, नरेंद्र पाटील, महादेव जानकर आणि आनंदराव पाटील यांचा आठ कोटी निधी उपलब्ध झाला होता. तसेच प्रभाकर घार्गे यांचा डिसेंबरपर्यंतचा निधी एक कोटी ३३ लाख रुपये उपलब्ध झाला होता. तोही खर्च झाला आहे. तर माढाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून दोन कोटी उपलब्ध झाले होते. त्यापैकी दीड कोटी खर्च झाले आहेत. तसेच बाहेरच्या आमदारांपैकी दत्तात्रय चव्हाण, शरद रणपिसे, आनंद गाडगीळ यांच्याकडून निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्याबाहेरील तसेच जिल्ह्यातील आमदारांचा एकूण मिळून २६ कोटी ३३ लाख रुपये जिल्ह्याला 
उपलब्ध झाले होते. तो सर्व निधी खर्च झाला आहे.

बाहेरच्या खासदारांचा निधीही खर्च
दरम्यान, बाहेरच्या खासदारांकडून एकूण साडेतीन कोटी रुपये उपलब्ध झाले होते. त्यात आनंदराव अडसूळ यांच्याकडून २० लाख, सचिन तेंडुलकर यांच्याकडून ५० लाख, तर अनु आगा यांच्याकडून दीड कोटी रुपये निधी जिल्ह्याला जलसंधारणांच्या कामांसाठी उपलब्ध झालेला आहे. तोही संपूर्ण खर्च झाला आहे.