भिलवडी खून प्रकरण; संशयित आरोपींची नावे निष्पन्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

भिलवडी - माळवाडी (ता. पलूस) येथील शाळकरी मुलीवरील बलात्कार व खूनप्रकरणाचा गुंता उलगडण्यास आठ दिवसांनंतर पोलिसांना यश आले आहे. आरोपींची नावेही जवळपास निष्पन्न झाली आहेत. शेवटचा पुरावा बाकी असल्यामुळे पोलिसांनी गोपनीयता पाळली आहे. गेले आठ दिवस जिल्ह्यासह सर्वत्र गूढ निर्माण झालेल्या खुनाचा उद्या (ता. 14) छडा लावला जाईल अशी शक्‍यता आहे.

आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा प्रकार आठ दिवसांपूर्वी भिलवडी येथे उघडकीस आला होता. राज्यभर या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सुमारे 200 हून अधिक पोलिस तपासात गुंतले होते.

परिसरातील 150 हून अधिकजणांची चौकशी याप्रकरणात करण्यात आली. वैद्यकीय पुराव्यासह तांत्रिक पुरावे शोधण्यात आठ दिवस पोलिस गुंतले होते. खुनाचा प्रकार उघडकीस आलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच पोलिसांनी एका हॉलमध्ये ठिय्या मांडला आहे. तेथूनच या खुनाचे तपासकार्य सुरू आहे.

खुनाच्या कारणांची उलटसुलट चर्चा आठ दिवसांपासून रंगली आहे. मात्र, पोलिसांनी तपासाबाबत गोपनीयता बाळगली आहे. आठ दिवसांनंतर काही ठोस पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांची नेहमीची तपासाची लगबग आज कमी झाल्याचे दिसले. त्यामुळे पोलिस अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचल्याचेही स्पष्ट झाले. दीडशे जणांच्या चौकशीतून नेमक्‍या संशयितांची नावे पोलिसांनी निष्पन्न केली आहेत.

दरम्यान, तपास अधिकारी उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांना तपासाबाबत विचारले असता, त्यानी तपासात प्रगती असून लवकरच उलगडा होईल, असे सांगितले. मात्र अधिक माहिती देण्यास नकार दिला.