लोणंदमध्ये पत्नी व मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

लोणंद - पत्नीचा व अडीच वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून करून एकाने आत्महत्या केल्याची घटना येथील इंदिरानगरमध्ये आज उघडकीस आली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने लोणंद शहर सुन्न झाले आहे. संदीप चंद्रकांत कोळेकर (वय 32), रेखा (वय 27) व मुलगा आदेश अशी मृतांची नावे आहेत.

लोणंद - पत्नीचा व अडीच वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून करून एकाने आत्महत्या केल्याची घटना येथील इंदिरानगरमध्ये आज उघडकीस आली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने लोणंद शहर सुन्न झाले आहे. संदीप चंद्रकांत कोळेकर (वय 32), रेखा (वय 27) व मुलगा आदेश अशी मृतांची नावे आहेत.

लोणंद पोलिसांनी सांगितले, की संदीप कोळेकर हा गावोगावच्या आठवडा बाजारात भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता. काल सायंकाळी सातच्या सुमारास त्याने पत्नी रेखा हिचा दोरीने गळा आवळून व पोटच्या अडीच वर्षांच्या आदेश या मुलाचा नाक- तोंड व गळा दाबून खून केला. घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन स्वतःच्या दोन्ही हातांच्या नसा ब्लेडच्या साह्याने कापून नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत रात्री साडेआठ वाजेपर्यंत कोणालाच काही समजले नाही. मात्र, रात्रीचे साडेआठ वाजून गेले, तरी कोळेकर यांचे दार बंद का म्हणून शेजारच्या लोकांनी दार ठोठावण्याचा प्रयत्न केला. आतून कसलाच प्रतिसाद न मिळाल्याने दाराच्या फटीतून आत डोकवण्याचा प्रयत्न केला असता त्या वेळी रेखा या बाहेरच्या खोलीत फरशीवर पडलेल्या दिसल्या. लोकांनी दार तोडून घरात प्रवेश केला तेव्हा सारा प्रकार उघडकीस आला. जमलेल्यापैकी एकाने लोणंद पोलिस ठाण्यात फोन करून या घटनेबाबतची माहिती कळवली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप भोसले घटनास्थळी आले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. आज सकाळी तिघांवरही येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी अपत्य नको म्हणून?
संदीप कोळेकर याचे रेखा यांच्याशी दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. जळोची (ता. बारामती) त्यांची सासरवाडी आहे. त्याचा एक भाऊ मुंबई पोलिसांत कार्यरत आहे. पत्नी रेखा या चार महिन्यांच्या गरोदर होत्या. मात्र, हे मूल नको म्हणून या दोघा पती-पत्नीमध्ये भांडण होत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Web Title: murder & suicide