खुनाची फिर्याद मागे घेण्यासाठी न्यायालय आवारात खुनी हल्ला

खुनाची फिर्याद मागे घेण्यासाठी न्यायालय आवारात खुनी हल्ला

सांगली - खुनाची फिर्याद मागे घेण्यासाठी इरफान अजिज मुल्ला (वय 32, मटण मार्केटजवळ, सांगली) याच्यावर भरदिवसा न्यायालय आवारात पोलिसांसमोरच खुनी हल्ला केल्याचा प्रकार दुपारी एक वाजता घडला. खून खटल्याची सुनावणी सुरू होण्यापूर्वीच संशयितांनी घातक शस्त्रासह हल्ला चढवला. हल्ल्यानंतर दगडफेकीचा प्रकारही घडला. त्यामुळे न्यायालय परिसरात अनेकांची पळापळ झाली. शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिस्थिती आटोक्‍यात आणली.

अधिक माहिती अशी, शंभरफुटी परिसरातील इम्रान मुल्ला याने एकावर हल्ला करण्यासाठी 50 हजार रूपयाची सुपारी घेतली होती. 20 हजार रूपये मिळाल्यानंतर उर्वरीत 30 हजार रूपये मागण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या हल्ला चढवून निर्घृण खून करण्यात आला. 22 नोव्हेंबर 2014 रोजी इम्रानचा खून करण्यात आला. मृत इम्रानचा भाऊ इरफान मुल्ला याने अब्दुलमोबीन वाहिदखान पठाणसह त्याच्या कुटुंबातील सातजणांविरूद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सातजणामध्ये एका महिलेचाही सहभाग आहे. खुनप्रकरणातील तिघे संशयित सध्या कारागृहात आहेत.

खुनाचा तपास होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आज खटल्याची पहिली तारीख होती. सुनावणीसाठी फिर्यादी इरफान मुल्ला, भाऊ फारूख मुल्ला आणि नातेवाईक हजर होते. तर जामिनावर सुटलेले चौघे संशयित आरोपी, कारागृहातून न्यायालयात आणलेले तिघे संशयित व नातेवाईकही हजर होते. दुपारी एकच्या सुमारास जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होण्यापूर्वी दोन्ही कुटुंबातील काही जणांची नजरानजर होताच एकमेकांना खुन्नस दिली. खुनातील संशयित आरोपी व नातेवाईक तयारीत होते. त्यानी फिर्यादी इरफानला गाठून घातक शस्त्रासह हल्ला चढवला. त्याच्या पाठीवर आणि हातावर लांबलचक वार केले. पोलिसांसमोरच हा प्रकार घडला. बंदोबस्तासाठी आलेले पोलिस धावले. फिर्यादी इरफानवर हल्ला झाल्याचे समजताच आजूबाजूला थांबलेले नातेवाईक गोळा झाले. भरदिवसा न्यायालयासमोरच हल्ला झाल्यामुळे पळापळ झाली. तसेच एकमेकांवर दगडफेक झाली. त्यामुळे न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्यांची घाबरगुंडी उडाली.

पोलिसांनी संशयित आरोपींना तत्काळ बंदोबस्तात गाडीत नेले. शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ धाव घेतली. गर्दी हटवण्यासाठी काहीजणांवर लाठी उगारली. जखमी इरफानला तत्काळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले.

फिर्याद मागे घेण्यासाठी यापूर्वीही हल्ले-
मृत इम्रानच्या खुनातील साक्षीदार व फिर्यादी इरफान याने केस मागे घ्यावी म्हणून पावणे दोन वर्षापूर्वी त्याचा पाठलाग करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याबाबत त्याने फिर्याद दिली आहे. फिर्याद मागे घेण्यासाठी संशयित आरोपींनी काहीजणांना मध्यस्थी घातले होते. तरीही फिर्याद मागे न घेतल्यामुळे आज इरफानवर हल्ला चढवून दहशत निर्माण करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com