बिबट्याच्या बछड्याला जीवदान! विहिरीतून काढले बाहेर

हरिभाऊ दिघे
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

  • पिंपरणे येथील घटना
  • युवकांनी बछड्यास विहिरीतून बाहेर काढले 

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रोहम वस्तीवर राहणारे शेतकरी कैलास चत्तर यांच्या विहिरीत तीन महिन्याच बिबट्याचं बछडं सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पडले. परिसरातील तरुणांनी सदर बछड्याला विहिरीतून बाहेर काढत त्याच्यावर औषधोपचार केले. त्यानंतर सदर बछड्याला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

पिंपरणे याठिकाणी रोहम वस्ती येथे कैलास चत्तर हे आपल्या विहिरीतील मोटार चालू करण्यासाठी सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गेले. त्याच वेळी त्यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला. याबाबत त्यांनी काका गायकवाड, संजय बागुल, विवेक चत्तर, सकाहारी गायकवाड, संतोष चत्तर, अजित चत्तर यांना सांगितले.

या सर्वांनी दोरीच्या साहाय्याने सदर बछड्याला विहिरीतून बाहेर काढत जवळच असलेल्या दावल बाबा मंदीरात ठेवले. वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल शेखर पाटोळे, अरुण यादव, सुखदेव राहिंज, भाऊ पारासूर हे घटनास्थळी आले. औषधोपचार करण्यासाठी सदर बछड्यास चंदनापुरी येथील एनआयसी येथे हलविले. तरुणांच्या सतर्कतेमुळे बिबट्याच्या बछड्याला जीवदान मिळाले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :