साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे अपघातातून वाचले

 संजय आ.काटे
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

नागवडे यांची गाडी त्या खड्यातून उडाली आणि शेजारच्या शेतात जावू लागली.  चालक भोसले यांनी गाडीवरचा ताबा सुटू दिला नाही तरी गाडी शेतात पावसाच्या साचलेल्या पाण्यात खोलवर गेली

श्रीगोंदे, (जिल्हा नगर) - मुंबईला बैठकीसाठी जाणाऱ्या साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे आज अपघातातून सुदैवाने वाचले. काष्टी येथे समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात नागवडे यांच्या गाडीच्या चालकाने रस्त्याच्या खाली घेतलेली गाडी पावसामुळे थेट शेतातील पाण्यात गेली. सुदैवाने चालकाने तोल जावू न देता गाडी पलटी होणार नाही याची दक्षता घेतल्याने अनर्थ टळला. यात नागवडे यांना दुखापत झाली नाही मात्र दुचाकीस्वार जखमी झाले. 

नागवडे सकाळी मुबंईला जाण्यासाठी कारमधून निघाले होते. काष्टी जवळील माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या अधिपत्याखालील परिक्रमा शैक्षणिक संकुलाजवळ समोरुन भरधाव वेगाने  मालमोटार येत होती. तीला रस्ता देत असतानाच त्या मालमोटारीला ओव्हरटेक करणाऱ्या तरुणांची गाडी अचानक समोर आली. त्यामुळे नागवडे यांच्या गाडीवरील चालक दिलीप भोसले यांनी त्या तरुणांना वाचविण्यासाठी त्यांची गाडी रस्त्याच्या खाली घेतली. त्यावेळी तेथे खड्डा होता. मात्र तो पावसाच्या पाण्याने भरल्याने त्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि नागवडे यांची गाडी त्या खड्यातून उडाली आणि शेजारच्या शेतात जावू लागली.  चालक भोसले यांनी गाडीवरचा ताबा सुटू दिला नाही तरी गाडी शेतात पावसाच्या साचलेल्या पाण्यात खोलवर गेली. 

परिक्रमाचे विद्यार्थी, शेजारीच असणाऱ्या साईकृपा दूध डेअरीचे कर्मचारी घावून आले. त्यांनी नागवडे व चालक भोसले यांना गाडीतून सुखरुप बाहेर काढले. त्याचवेळी नागवडे यांच्या गाडीला तरुणांची मोटारसायकल धडकली होती. मात्र जखमी तरुणास अगोदर पहा असे नागवडे यांनी सांगितले. त्या जखमींना दौंड येथील रुग्णालयात हलविले. नागवडे यांच्याशी नंतर संपर्क साधला असता, अपघात झाला मात्र त्यात काही झाले नाही. त्या तरुणाना लागल्याचे समजले. चालकाने हुशारी दाखविल्याने सगळेच वाचल्याचे सांगितले.