"राधाकृष्ण विखेंकडून शेतकरी संप मोडित काढण्याचा प्रयत्न'!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

राज्यातील संपाचा केंद्रबिंदू असलेले पुणतांबे राधाकृष्ण यांच्याच अधिपत्याखालील भागात आहे. असे असताना त्यांनी या संपाकडे दुर्लक्ष केले. उलट स्वतःची संघर्ष यात्रा यशस्वी करण्यासाठी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी सुरू केलेला संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला

नगर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे थोरले बंधू डॉ. अशोकराव विखे पाटील यांनी शेतकरी संपाच्या निमित्ताने पुन्हा राधाकष्ण विखे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 

डॉ. अशोकराव विखे पाटील यांनी पुणतांब्यात शेतकरी संपाला पाठिंबा देत बंधू राधाकृष्ण विखेंवर आरोपाच्या फैरी झाडल्या. "राज्यातील संपाचा केंद्रबिंदू असलेले पुणतांबे राधाकृष्ण यांच्याच अधिपत्याखालील भागात आहे. असे असताना त्यांनी या संपाकडे दुर्लक्ष केले. उलट स्वतःची संघर्ष यात्रा यशस्वी करण्यासाठी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी सुरू केलेला संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस संपाला पाठिंबा देत असताना कॉग्रेस का पाठिंबा देऊ शकत नाही,'' असा सवाल डॉ. विखे यांनी उपस्थित केला. 

''दिवंगत आजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकरी संघटित केला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले. त्यामुळे विखे घराण्याचा शेतकरी हाच केंद्रबिंदू राहिला आहे. आजोबांच्या विचाराची मोठी परंपरा विखे घराण्याला असताना राधाकृष्ण विखे या विचारापासून दूर होत असल्याचा,'' आरोप डॉ. अशोकराव विखे पाटील यांनी आंदोलनाच्या दरम्यान केला. आपण आजोबांच्या विचारसरणी घेऊन पुढे आलो आहे, असे म्हणून डॉ. विखे यांनी संपकरी शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची मदत दिली.