नगर जिल्हा शिक्षक बॅंकेच्या सभेत धक्काबुक्की, मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

सभेत काही शिक्षक गोंधळ घालून हाणामारी करीत असल्याचे कळाल्यानंतर घटनास्थळी गेलो. दारू प्यायल्याचा संशय असलेल्या आणि गोंधळ घालणाऱ्या शिक्षकांना ताब्यात घेतले.
- अभय परमार, पोलिस निरीक्षक

नगर - जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत नेहमीप्रमाणे आजही प्रचंड राडा झाला. एकमेकांना धक्काबुक्की, ढकलाढकली आणि मारहाणही झाली. अखेरीस पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या वीस शिक्षकांना ताब्यात घेतले. अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांनी प्रास्ताविकातच सभा गुंडाळली.

सभा सुरू होण्यापूर्वीच विविध मागण्यांसाठी विरोधकांनी गोंधळास सुरवात केली. चोर, दरोडेखोर, पेताड, मवाली, "कशाचा काका; आलाय बोका', "सत्ताधाऱ्यांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय' अशा शेलक्‍या घोषणांनी शिक्षक बॅंकेच्या सभेत विरोधकांनी आज सभागृह दणाणून सोडले. संजय धामणे, रा. या. औटी, राजू शिंदे, एकनाथ व्यवहारे, रवींद्र पिंपळे मंचावर जाऊन घोषणा देऊ लागले. सत्ताधारी सभासद व संचालकांनी त्यांचा निषेध केला. दोन्ही गटांचा एकमेकांना चोर म्हणण्यावर जोर होता. बॅंकेचे उपाध्यक्ष बदलतात; पण अध्यक्षपदाला चिकटून बसल्याचा आरोप विरोधक करत होते. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना वारंवार धक्काबुक्की करत होते. तब्बल दोन तास मंचावर गोंधळच सुरू होता. सत्ताधारी मंडळाच्या महिला मंचावर जाताच विरोधक महिलाही तेथे गेल्या. गोंधळात महिलांनाही धक्काबुक्की झाली. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला.

काय झालं सभेत...
- विरोधकांनी वार्षिक अहवाल फाडला
- डोक्‍यावरील टोप्या फाडल्या
- मंचावर बुक्का फेकला
- तक्के एकमेकांच्या अंगावर फेकले
- वार्षिक सभेचा बॅनर फाडला
- मंचावर दारूचा घमघमाट
- धक्काबुक्की, माईक हिसकावणे
- मंचावर महिला असल्याचा शिक्षकांना विसर