डॉक्टरांना भुल (विण्याचा) प्रयत्न अंगलट; शिक्षकासह दोघांचा प्रताप

संजय आ. काटे
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

श्रीगोंदे, (जिल्हा नगर) : 'तुम्ही बनावट औषधे देवून रुग्णांची फसवणूक करता अशा तक्रारी आल्याने रुग्णालयासह औषध दुकानाची तपासणी करण्यासाठी आलो आहोत' अशी बतावणी करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश झाला. जलालपूर (ता. कर्जत) व शेडगाव (ता. श्रीगोंदे) येथे दवाखाना चालविणारे डॉ. सुधीर फुले यांच्या हुशारीने हा बनावट छापा समोर आला. धक्कादायक म्हणजे बनावट छाप्यात एका शिक्षकाचाही समावेश असल्याची जोरदार चर्चा आहे.

श्रीगोंदे, (जिल्हा नगर) : 'तुम्ही बनावट औषधे देवून रुग्णांची फसवणूक करता अशा तक्रारी आल्याने रुग्णालयासह औषध दुकानाची तपासणी करण्यासाठी आलो आहोत' अशी बतावणी करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश झाला. जलालपूर (ता. कर्जत) व शेडगाव (ता. श्रीगोंदे) येथे दवाखाना चालविणारे डॉ. सुधीर फुले यांच्या हुशारीने हा बनावट छापा समोर आला. धक्कादायक म्हणजे बनावट छाप्यात एका शिक्षकाचाही समावेश असल्याची जोरदार चर्चा आहे.

डॉ. सुधीर व त्यांच्या पत्नी वैशाली यांचे जलालपूर येथे दवाखाना व औषधाचे दुकान तर शेडगाव येथे दवाखाना आहे. काही दिवसांपुर्वी डॉ. फुले हे शेडगाव येथील दवाखान्यात असताना त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला की त्यांच्या दवाखान्यावर छापा पडला असून, संबधीत लोक छायाचित्रे काढून धमकावत आहेत. फुले यांनी फोन त्या अधिकाऱ्यांकडे देण्यास सांगितल्यावर त्यांनाही दमदाटी सुरु झाली. सगळी कागदपत्रे दाखवितो आपण शेडगावच्या दवाखान्यात या असे सांगितले.

त्यानंतर काही वेळाने ते दोघे जण शेडगाव येथील त्यांच्या दवाखान्यात आले. दवाखाना व औषध दुकानांचे परवाने दाखवा, तुमच्याबद्दल खुप तक्रारी आहेत असे बजावत छायाचित्र घेण्यास सुरुवात केली. डॉक्टर फुले यांना काहीच समजत नव्हते. सगळे नियमात असतानाही छापा म्हटल्यावर त्यांनाही घाम फुटला कारण समोरुन धमकाविणे सुरु होते. त्यांनी त्यांच्या मुलाला कागदपत्रे आणण्यास सांगितले. मात्र, त्या दोघांनी कागदपत्रांची गरज नाही, तुमच्यावर मोठा छापा आहे, सहिसलामत सुटायचे असेल तर तडजोड करा, असे बजाविले. पन्नास हजार द्या सगळे ओके करुन घेतो असे सांगितल्यावर डॉ. फुले यांना त्यांच्याविषयी शंका आली. मोबाईलवर बोलण्याचा अभिनय करीत ते दरवाजा बाहेरुन लावून त्यांना कोंडण्याच्या उद्देशाने जात असतानाच त्या दोघांच्या हे लक्षात आले. डॉक्टरांना धक्का देवून त्या दोघांनी तेथून पलायन केले. मात्र, त्याचवेळी फुले यांनी त्यांच्या मोटारीचा क्रमांक घेतला.

फुले यांनी याबाबत राशीन व श्रीगोंदे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या मोटारीचा शोध घेतला असता ती एका शिक्षकांची असून, पोलिस व डॉक्टरांच्या चौकशीत त्या छाप्यात एका शिक्षकासह त्याचा सहकारी सहभागी असल्याचे समजले.  त्याबाबत अजून कुणावरही कारवाई झाली नसली तरी पुढचे बालंट टाळण्यासाठी 'त्या 'छाप्यावाल्यांनी कर्जत व श्रीगोंद्याच्या राजकीय नेत्यांची मनधरणी सुरु केल्याचे समजले.

याबाबत शेडगावचे सरपंच विजय शेंडे म्हणाले, अशाप्रकारे प्रामाणिक व नियमातीला व्यक्तींना त्रास देवून लुबाडले जात असले तर आरोपींना कुणीही मदत करु नये. उलट पोलिसांनी या घटनेचा नि:पक्षपातीपणे चौकशी करुन संबधीतांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करुन लोकांसमोर आणले पाहिजे.