शेतकऱयांनी ऊसतोडी बाबत काळजी करू नयेः मोनिका राजळे

सुनील अकोलकर
गुरुवार, 18 जानेवारी 2018

तिसगाव (नगर) : कार्य क्षेत्रात ऊसाची लागवड व उत्पादन दुपटीने झाल्याने आपला ऊस तूटतो की नाही असा संभ्रम काही शेतकऱ्याच्या मनात दिसून येत आहे. परंतु, त्यांनी ऊसतोडी बाबत काळजी करू नये. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील ऊसाच्या शेवटच्या टिपरूचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही, अशी ग्वाही आमदार मोनिका राजळे यांनी वृद्धेश्वरच्या साखर पोत्याच्या पूजन प्रसंगी दिली.

तिसगाव (नगर) : कार्य क्षेत्रात ऊसाची लागवड व उत्पादन दुपटीने झाल्याने आपला ऊस तूटतो की नाही असा संभ्रम काही शेतकऱ्याच्या मनात दिसून येत आहे. परंतु, त्यांनी ऊसतोडी बाबत काळजी करू नये. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील ऊसाच्या शेवटच्या टिपरूचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही, अशी ग्वाही आमदार मोनिका राजळे यांनी वृद्धेश्वरच्या साखर पोत्याच्या पूजन प्रसंगी दिली.

वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या सन 2017-18 गळीत हंगामातील आता पर्यंत उत्पादित साखर पोत्याचे पूजन आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष रामकीसन काकडे हे होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पाथर्डीचे नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, जेष्ठ संचालक उद्धव वाघ, पांडुरंग खेडकर, सुभाष ताठे, बापूसाहेब भोसले, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, राहुल गवळी, सुनील ओव्हळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले की, कारखान्याने चालू गळीत हंगामात 5 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे जे उद्दिष्ठ ठेवले आहे, ते निश्चित पूर्ण होईल यात कुठलीही शंका नाही. या हंगामाची वाटचालही त्या दृष्टीने चालू आहे. मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्या पर्यंत गाळप चालू राहणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱयांनी ऊस तोडीची चिंता करू नये. दुष्काळात मोठ्या प्रमाणात झालेली जलसंधारणची कामे तसेच मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने ऊसाची लागवड वाढलेली आहे. त्यामुळे पुढचा हंगाम मोठा असल्याने त्याचे नियोजन चालू आहे. भविष्काळाची गरज ओळखून कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करणार आहे. हंगामी कामगार व कर्मचाऱयांना कारखान्याच्या वतीने पगारवाढ जाहीर करून आमदार मोनिका राजळे यांनी मकर संक्रातीची गोड भेट दिली.

चालू गळीत हंगामातील 74 दिवसात 2 लाख 10 हजार मेट्रिक टन ऊस गाळप होऊन 2 लाख साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जे. आर. यांनी प्रास्ताविकात दिली.

यावेळी कारखान्याचे संचालक चारुदत्त वाघ, भास्कर गोरे, भीमराज सागडे, सचिन नेहुल, पोपट आंधळे, शरद अकोलकर, कारखान्याचे सचिव आर.जे. महाजन, प्रशासकीय अधिकारी विनायक म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील पत्रकाराचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला. सूत्र संचालन राजू सुरवसे यांनी तर आभार सुभाष आंदुरे यांनी मानले.

Web Title: nagar news farmer sugar cane monika rajale