आत्मविश्वासाच्या बळावर 'कल्याणी'ची भरारी !

Kalyani Gadakh success story
Kalyani Gadakh success story

तळेगाव दिघे (जि. नगर) : पाच वर्षांपूर्वीची गोष्ट.. संगमनेर महाविद्यालयात शिकणारी एक विद्यार्थीनी डॉ. संजय मालपाणींच्या भेटीला आली.. आकाश गाठायचे ध्येय तिच्या डोळयात अगदी स्पष्ट दिसत होते.. पण परिस्थिती तिच्या पंखांना फडफडू देत नव्हती.. काय करु ? हा मार्ग योग्य की तो ? पैसे कोठुन आणू ? माझे शिक्षण पूर्ण होईल की नाही ? असे अनेक प्रश्नही तिच्या मनात दाटलेले. पण उमेद मात्र कायम होती. तिला मदतीचा हात मिळाला, सोबतीला योग्य मार्गदर्शन अन् उभारी देणारी ऊर्जाही मिळाली.. पाच वर्षानंतर जेव्हा ही विद्यार्थीनी पेढयाचा पुडा घेऊन पुन्हा डॉ. मालपाणींच्या भेटीला आली तेव्हा चित्र पालटलेले होते.. तिचा आत्मविश्वास, परिस्थितीशी तिचा संघर्ष तिला कधीच शिखराच्या दिशेने घेऊन निघाला होता..!

सन 2013 सालची गोष्ट.. पारेगाव गडाख ( ता. संगमनेर ) सारख्या ग्रामीण व सतत अवर्षणाचा सामना करणाऱ्या खेडयातील कल्याणी दिनकर गडाख या मुलीने बारावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळविले. मराठीत 88 तर भुगोलात 85. तिला बारावीनंतर बी.सी.एसला ( संगणक शास्त्र ) प्रवेश घ्यायचा होता, पण परिस्थिती आडवी आली. या कोर्सला शिष्यवृत्ती नसल्याने फी आवाक्याबाहेरची होती. उंच उडू.. आपली, आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बदलु हे ध्येय मनात घेऊन ती संगमनेर महाविद्यालयात पोहोचली खरी, पण इथे आल्यावर कोर्सची फी, पुढील खर्च पाहुन ती हबकली. काय करावे या विवंचनेत असतांनाच तिला दिशादर्शक फलक दिसावा तसे कोणीतरी डॉ. संजय मालपाणींच्या कार्यालयाची दिशा दाखवली. शिकण्याची आस अन् प्रगतीचा ध्यास मनात असलेली ही विद्यार्थीनी लागलीच त्या दिशेने निघाली. डॉ. संजय मालपाणींची भेट झाली, दहावी, अकरावी, बारावीचे गुणपत्रक पाहुण ते सुध्दा काही क्षण थबकले. शिक्षण सुविधांचा अभाव असतानाही तिने उत्तम गुण मिळविले होते. जीवनाच्या निर्णायक टप्प्यावर मात्र ती हतबल झाली होती. शिकण्याची प्रचंड इच्छा, पण परिस्थिती साथ देणारी नव्हती. डॉ. मालपाणींनी तिला पुढील शिक्षणासाठी सहाय्य करण्याचे आश्वासन देऊन तिची मानसिकता स्थिर केली. एव्हाना संगणक शास्त्राचे प्रवेश संपलेले होते. मराठी आणि भुगोलातील तिचे प्रावीण्य बघुन संगणक शास्त्रात रडत-खडत जेमतेम गुण मिळविण्यापेक्षा एम.ए करुन पुढचा मार्ग प्रशस्त करता येईल असा वडीलकीचा सल्ला डॉ. मालपाणींनी तिला दिला, तिलाही तो पटला. सोबत-सोबत तिचे मनातील ध्येय पुर्णत्वास जावे म्हणून त्यांनी 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविल्यास नोकरीची हमीही दिली. या एका शब्दावर ती झपाटल्यागत अभ्यासात गुंतली. शैक्षणिक साहीत्यासाठी तिने महाविद्यालयाच्या 'कमवा आणि शिका' योजनेचाही आधार घेतला.

सातत्यपूर्ण अभ्यास आणि डोळयासमोर लक्ष्य ठेऊन ती विशेष श्रेणीत बी.ए उत्तीर्ण झाली. एम.ए करतांना तिने भुगोल विषय निवडला. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ती महाविद्यालयात थांबून ग्रंथालय व संगणक प्रयोगशाळेचा पुरेपूर उपयोग करुन घेऊ लागली. शिक्षणासाठीची तिची धडपड संगमनेर महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नजरेतून सुटली नाही. विभागातील प्राध्यापकांचेही तिला सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. प्रचंड परिश्रम आणि सतत ध्येयाचा ध्यास घेऊन तिने एम.ए च्या परिक्षेत केवळ 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुणच नव्हे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहावे स्थान मिळविले. तिच्या अपेक्षेप्रमाणे तिला आज 'टॉमटॉम' कंपनीत नोकरीही लागली आहे. तिने आत्मविश्वासाच्या जोरावर घेतलेली उंच भरारी आणि त्यातून घडलेला तिचा शिक्षण प्रवास थक्क करणारा आहे. आपल्या मुलीच्या ध्येयवेडया प्रवासाचे वर्णन करताना तिच्या पालकांचे डोळे अभिमानाने आणि मुलीच्या कौतुकाने अक्षरशः चिंब होत आहेत. तिचा शिक्षण प्रवास 'यशोगाथा' ठरला आहे.

अचानक कल्याणी पेढे घेऊन आली. ती एम.ए ( भुगोल ) या परीक्षेत पुणे विद्यापीठात सहावी आली होती. सोबत परीक्षेच्या निकालापूर्वीच तिला 'टॉमटॉम' या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीही मिळालेली होती. तिला समोर पाहुन मला पाच वर्षांपूर्वीची कल्याणी आठवली. शिक्षणासाठीची तिची धडपड आणि तिने आज मिळवलेले यश प्रेरणादायी होते.
- डॉ. संजय मालपाणी, कार्याध्यक्ष - शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com