कोपर्डी खटला- छेडछाडीनंतर पोलिसात तक्रार का केली नाही !

सूर्यकांत नेटके
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

अंतिम युक्तिवादात अॅड. मकासरे यांचे म्हणणे; कागदपत्रे खोटे असल्याचा दावा

नगर : कोपर्डी येथील अत्याचार व खून खटल्यातील आरोपींनी घटनेच्या आधी तीन-चार दिवस आधी छेडछाड केली होती. मग त्याबाबत तक्रार का दिली नाही असा प्रश्‍न आरोपी जितेंद्र शिंदे याचे वकील अॅड. योहान मकासरे युक्तीवादात उपस्थित केला. आरोपीच्या कपडे जप्त करणे, पंचनामा व अन्य बाबींवरही त्यांनी आक्षेप नोंदवला. सरकारी पक्षाने कथा रंगवली, दाखल केलेले कागदपत्रे खोटी असल्याचा दावा त्यांनी केला. 

कोपर्डी बलात्कार व खून खटल्यात आरोपी जितेंद्र शिंदे याच्यातर्फे जिल्हा न्यायालयात विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर अंतिम युक्तिवाद सुरु आहे. आज (रविवारी) सुटी असूनही कोपर्डी खटल्याचे कामकाज सुरु होते. शिंदेची बाजू मांडताना अॅड. मकासरे म्हणाले, "कोपर्डी गावात एकाच आडनावाचे आणि एकमेकांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे गावात वजन आहे. जर पीडितेची घटनेआधी तीन-चार दिवस छेड काढली होती, तर मग पोलिसांत तक्रार का दिली नाही.

शाळेतील मुख्याध्यापक व अन्य शिक्षकांनी तपासात सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार मदत केली. मात्र पीडित मुलीने कोणत्याही खो-खोच्या स्पर्धेत सहभाग घेतला नाही. मुलगी शाळेत हजर होती, मात्र ते लपवण्यासाठी हजेरीपत्रक बदलले. तिच्या मैत्रिणींनी दिलेला जबाब व साक्ष यात तफावत आहे. त्यांना वर्गांत किती मुले-मुली आहेत, स्कुलबसमधून कोण कोणत्या ठिकाणी उतरते, हे त्यांना सांगता येत नाही. त्यामुळे त्या तिच्या मैत्रिणी नाहीत, त्या तिच्यासोबत शाळेत जात नव्हत्या हेही स्पष्ट झाले आहे. मात्र सरकारी पक्षाने ठरवून जबाब घेतला व आरोपी संतोष भवाळ, नितीन भैलुमेचा सहभाग कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेनंतर तेथून आरोपी जितेंद्र शिंदे जर चपला टाकून पळून गेला असे म्हणणे आहे तर मग त्याच्या पायाला जखमा कशा नाहीत असा प्रश्‍न त्यांनी आज उपस्थित केला.

अनेक बाबींत तफावत आरोपीचे कपडे जप्त करण्याबाबत न्यायालयाच्या नियमाचे पालन झाले नसल्याचा अॅड. मकासरे यांनी दावा केला आहे. दाखल केलेल्या कादगपत्रावर आवश्‍यक सह्या नाहीत. अगोदर घटनेची खबर देऊन त्यावर तपास करत गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. मात्र फिर्याद दाखल करण्याबाबत घाई केली. अनेक बाबींत तफावत असल्याचे त्यांनी म्हणणे मांडले.

 

Web Title: nagar news kopardi rape case court argument