'कोपर्डी'प्रकरणी साक्षी-पुरावे नोंदविण्याचे काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नगर - कोपर्डी बलात्कार व खून खटल्यात सरकार पक्षाकडून सर्व साक्षी- पुरावे नोंदविण्याचे काम पूर्ण झाल्याचे बुधवारी न्यायालयात सांगण्यात आले. एका नवीन साक्षीदाराची सरतपासणी व उलटतपासणीही आज घेण्यात आली. खटल्यात एकूण 31 साक्षीदार तपासण्यात आले असून, खटल्याचे कामकाज जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खून खटल्याची आज चौथ्या दिवशी विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नवीन साक्षीदार पोलिस नाईक कॉन्स्टेबल भाऊसाहेब कुरंद यांची सरतपासणी घेतली. कुरंद यांनी सांगितले, की पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या सूचनेवरून 14 जुलै 2016 रोजी मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याला श्रीगोंदे बसस्थानकावरून ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपी संतोष भवाळ हा जवळच नातेवाइकांकडे लपला असल्याचे समजले. त्याला पिंपळवाडी (ता. कर्जत) येथून ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपी नितीन भैलुमे याला पुण्यात 17 जुलैला मध्यरात्री जहॉंगीर हॉस्पिटलजवळून ताब्यात घेतले.

कुरंद यांनी तीनही आरोपींना ओळखले. आरोपींच्या वकिलांनी त्यांची उलट तपासणी घेतली. दरम्यान, कुरंद कोपर्डी खटल्यातील अखेरचे साक्षीदार ठरले. आता यानंतर एकही साक्षीदार तपासणार नसल्याचे निकम यांनी जाहीर केले. त्यामुळे 21, 22 व 23 जूनला होणाऱ्या पुढील सुनावणीत तिन्ही आरोपींचे जबाब नोंदविले जाण्याची शक्‍यता आहे.