राष्ट्रवादी काँग्रेस गुरफटली 'सोधा'च्या राजकारणात

डॉ. बाळ ज. बोठे पाटील
शुक्रवार, 7 जुलै 2017

बालेकिल्ल्यांपुरती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी!
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आल्यानंतर पक्षसंघटना बळकटीसाठी मोठे प्रयत्न होतील, असा अंदाज होता. वळसे यांचे प्रयत्नही तसेच आहेत. 'कोणीही स्वतःच्या बालेकिल्ल्यापुरते काम न करता जिल्हा म्हणून एकत्र यावे' असा त्यांचा नेहमीच आग्रह असतो. मात्र, त्यांच्या या आग्रहाला नेहमीच वाटाण्याच्या अक्षता देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे, तर कोणत्याही तालुक्‍यात कार्यक्रम घ्यायचा असेल, तर त्यांना तेथील 'किल्लेदारा'ची ना-हरकत घ्यावी लागते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एकेकाळी मजबूत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आता नेत्यांच्या बालेकिल्ल्यापुरती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे.

'ज्येष्ठ नेते शरद पवार बोले अन्‌ जिल्हा त्यानुसार चाले' अशी एकेकाळी परिस्थिती असलेल्या नगर जिल्ह्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था जवळपास दयनीय अशीच झाली आहे. प्रत्येक जण आपापल्या बालेकिल्ल्यात 'किल्लेदार' झाल्याने जिल्ह्यात पक्षाची संघटना खिळखिळी झाली आहे. विधानसभेपाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये पक्षाचे बळ घटत चालले आहे. पक्ष आणि त्यांच्या आघाड्यांची अवस्था तर सांगायच्या पलीकडे गेली आहे. 'सोयऱ्या-धायऱ्यांचे राजकारण असलेला जिल्हा' म्हणून पवार यांनी एकेकाळी नगर जिल्ह्याची व्याख्या जाहीर समारंभात केली आहे. तोच कित्ता त्यांच्याच पक्षातील नेते गिरवू लागल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता 'वेगळी वाट' शोधण्याच्या तयारीत आहे.

जिल्ह्यात एकेकाळी पहिल्या क्रमांकाचा असणाऱ्या या पक्षाला आत्मपरीक्षणाची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. तालुकानिहाय पक्षाची स्थिती पाहता भविष्यात आणखी मोठी घट झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको. पक्षाचा आदिवासी चेहरा म्हणून राज्यात मोठमोठी पदे उपभोगलेले मधुकर पिचड यांच्या अकोले तालुक्‍यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मोठी पीछेहाट झाली. मुळात राज्याचे नेते संबोधण्यात येत असलेल्या पिचड यांचा अकोले तालुका वगळता जिल्ह्यात इतरत्र ना स्वतःचा समर्थक गट ना कार्यकर्त्यांचा संच. वारसदार हा आपल्या घरातीलच अथवा कानाखालील असावा, हा अट्टहास त्यांच्यासह सर्वच नेत्यांना चांगला अंगलट येऊ लागला असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही काहीच फरक पडत नसल्याने पक्षाची अवस्था दयनीयतेच्या दिशेने झपाट्याने होत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत क्रमांक एकचा असलेला हा पक्ष या वेळी काँग्रेसच्या वळचणीला जाऊन कसाबसा सत्तेत आला. सामान्य कार्यकर्ता दुरावू लागल्यानेच पक्षाची ही अवस्था झाली असताना जिल्हा परिषदेत सत्तेची पदे आपल्याच नातेवाइकांना देण्याचा हट्ट धरण्यात आला. विशेष म्हणजे वरिष्ठ नेत्यांनीही तो हट्ट पुरविला.

जिल्हाभरात आजही अनेक कार्यकर्ते पक्षासाठी तन, मन आणि धनाने उभे राहू इच्छितात; पण सत्तेची पदे नेत्यांची तोंडे पाहून दिली जात असल्याने हा कार्यकर्ता प्रचंड अस्वस्थ आहे. अकोले तालुक्‍यात जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाची मोठी पीछेहाट झाली, तरीही जिल्हा परिषदेतील सत्तेचे पद पिचड यांच्याच सांगण्यावरून त्या तालुक्‍यात दिले गेले. एवढेच नव्हे, तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या घरात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद व शेवगावचे सभापतिपद देऊन सर्वसामान्य कार्यकर्ता फक्त वापरण्यापुरताच असतो, असा संदेशच जणू पक्षाने कार्यकर्त्यांना दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे ज्येष्ठ नेते पवार यांच्या संकल्पनेतील 'एक व्यक्ती, एक पद' या समीकरणाची पुरती वाट लावण्यात आल्याची भावना उघडपणे व्यक्त होत आहे.

श्रीगोंद्याचे युवा आमदार राहुल जगताप आणि नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडूनच सध्या पक्षबांधणीचे प्रयत्न होताना दिसत आहेत. श्रीगोंदे तालुक्‍यात संघटना जिवंत ठेवण्यासाठी राहुल जगताप आटापिटा करीत आहेत. मजबूत शक्ती असलेल्या बबनराव पाचपुते यांना तोंड देत ते पक्ष आणि कार्यकर्त्यांची पीछेहाट होणार नाही याची काळजी घेत आहेत. नगर शहरात संग्राम जगताप आक्रमक होऊन पक्षाचे अस्तित्व वेळोवेळी सिद्ध करत आहेत. विशेष म्हणजे शहर एकमेव ठिकाण असे आहे, की राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसही एकमुखाने जगताप यांच्यासोबत काम करत आहे. त्यामुळे महापालिकेच्या विविध प्रश्‍नांवरून थेट गल्ली-बोळातील समस्यांपर्यंत जगताप करडी नजर ठेवून आहेत.
जिल्हाध्यक्ष घुले यांच्या भूमिकेमुळे नेवासे तालुक्‍यात 'तेलही गेले अन्‌ तूपही गेले' अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र निर्माण केले गेले आहे. नेवाशात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा वरचष्मा असल्याचे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सिद्ध झाले आहे. मात्र, जिल्हाध्यक्ष घुले यांच्याशी त्यांचे न जमल्याने गडाखांनी राष्ट्रवादीशी फारकत घेत शेतकरी क्रांतिकारी पक्षाच्या माध्यमातून वेगळी चूल मांडली. परिणामी नेवासे तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती वाट लागली. जिल्हा परिषदेपाठोपाठ झालेल्या नेवासे नगरपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादीचे पुरते हसू झाले. या निवडणुकीत पक्षाला उमेदवारही मिळू नयेत एवढी दुर्दैवी वेळ आली. जिल्हाध्यक्षांच्या शेजारच्या तालुक्‍यात पक्षाची ही परिस्थिती असेल, तर जिल्हाभरात न विचारलेलेच बरे.

संघटनांच्या विविध आघाड्यांवरही मोठ्या प्रमाणात अनास्था आहे. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनीच जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाविरुद्ध बंडखोरी केली. त्यामुळे आता या आघाडीला जिल्हाध्यक्ष आहे की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. जिल्हा काय किंवा शहरात काय, या आघाडीवरील नियुक्‍त्या करतानादेखील पूर्णतः विचार केला जात नाही. पक्षाची ध्येयधोरणे माहीत नसलेले व पक्षात कोणतेही योगदान नसलेली मंडळी थेट मोठ्या पदांवर येऊ लागल्याने जुन्या, जाणत्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. युवक आघाडीचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. जिल्ह्याच्या युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण, असा प्रश्‍न विचारल्यास विचार करावा लागतो, यावरूनही या आघाडीचे अस्तित्व लक्षात यावे. हीच परिस्थिती विद्यार्थी आघाडीची आहे. जिल्ह्याचे सुपुत्र संग्राम कोते पाटील विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष असतानाही नगरला फारसा प्रभाव पडला नव्हता. तेच आता युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र, त्यांच्याच जिल्ह्यातील युवा आघाडी आज स्वतःला चाचपडत आहे. अद्यापही सर्व आघाड्यांचे पदाधिकारी सत्तेत असल्याच्याच भ्रमात आहेत, ही शोकांतिका आहे. पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटीसाठी आता बैठक होत आहे. मात्र, जिल्ह्यातील गाऱ्हाणी त्यांच्यापर्यंत जाऊ नयेत, यासाठी अगोदरच बांधाबांध झाल्याची चर्चा आहे. नेत्यांनी अगोदरच 'पूर्व बैठका' घेऊन नाराजीचा सूर बैठकीत लागणार नाही, याची काळजीही घेतली आहे.