मुलांसमवेत रमला 'प्रकाशवाटा' चा प्रवाशी

संजय आ.काटे
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

डॉ. आमटे म्हणाले, या मुलांच्या पालकांचा इतिहास तपासत बसू नका, त्यांचे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न  करू. लोकांकडे आता मुबलक पैसा आला असला तरी त्यातील काही पैसा सामाजीक कामात गुंतविला तरच त्यात सुख मिळते ही जाणीव झाल्याने सामाजीक कामाकडे लोक आकर्षित होत असल्याबद्दल समाधान आहे.

श्रीगोंदे - 'शिकुन पुढे काय व्हायचयं' या प्रश्नावर फासेपारधी समाजातील त्या चिमुकल्याने 'आयपीएस अधिकारी व्हायचय' असे उत्तर मिळताच  'व्वा क्या बात हैं' असे  उदगार  निघाले. हा संवाद सुरू होता श्रीगोंदे येथील महामानव बाबा आमटे संस्थेत. उत्तर देणारी मुले होती फासेपारधी समाजातील आणि त्यांना प्रश्नात गुंतवून स्वतः च त्यांच्यात रमलेले  लोकबिरादरीचे प्रमुख,जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे .

डॉ. आमटे यांनी  येथील महामानव बाबा आमटे संस्थेला भेट देवून तेथील फासेपारधी मुलांशी गप्पा मारल्या. त्यांच्यासमवेत मंदाताई आमटे होत्या. तत्पुर्वी घुगलवडगाव येथे संस्थेने घेतलेल्या जागेत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संस्थाचालक अनंत झेंडे यांच्या अथक प्रयत्नाने फासेपारधी समाजाचे ४१ मुले येथे संस्काराचे आणि शाळेत पुस्तकी धडे गिरवीत असल्याबद्दल त्यांनी समाधन व्यक्त करीत या संस्थेत काम करणाऱ्या सगळ्यांना शाबासकी दिली. आमटे यांनी या मुलांशी गप्पा मारताना त्यांचा चित्रपट पाहिला का त्यात काय काय आहे असे विचारताच त्या चिमुकल्यांनी सगळा चित्रपटच त्यांच्यासमोर उलगडून सांगितला. त्या मुलांचे पालक कुठे असतात असे विचारल्यावर काही जण गावी तर काही तुरुंगात असतात असे सांगताच सगळेच अस्वस्थ झाले. ते पाहून आमटे यांनी त्यातील एकाला उठवले आणि नाव विचारत पुढे काय व्हायचे आहे असे विचारताच त्यावर त्याने पहिले नाव सत्तूर तर आत्ताचे अर्जून असल्याचे सांगत त्याला पुढे आयपीएस अधिकारी व्हायचे असल्याचे सांगताच व्वा क्या बात हैं हे शब्द आमटे यांच्या तोंडून निघाले. झेंडे व विकास पाटील यांनी त्या मुलांची परिस्थितीत सांगत पहिले नावे त्यांची अशीच वेगळी होती मात्र आता त्यांना वेगळी नावे व ओळख दिल्याचे सांगितले.  यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन खामकर, डाॅ, अरुण रोडे,मंदाकिनी गोरे आदी उपस्थितीत होते.