शहागड ते शिवनेरी युवकांची ‘घोडेस्वारी’! संगमनेरच्या 25 युवकांचा सहभाग

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 18 जुलै 2017

घोड्यांवरून 65 किलोमीटर प्रवास 

शिवराय संघटनेची स्थापना...
महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी रणजितसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर राज्यातील तरुणांची नव्याने शिवराय निर्माण संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेत इतिहासप्रेमी तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.

तळेगाव दिघे (जि. नगर) : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक पेमगिरीचा किल्ले शहागड ते जुन्नर (जि. पुणे) येथील किल्ले शिवनेरी हा 65 किलोमीटरचा प्रवास संगमनेर तालुक्यातील 25 तरुणांनी राजहंस दुध संघाचे अध्यक्ष व अश्‍वप्रेमी संघटनेचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली घोडेस्वारी करुन पार पाडला.

 पेमगिरी (ता. संगमनेर) येथील शहागड येथून सोमवारी या प्रवासास सुरुवात करण्यात आली. त्यात शिवराय निर्माण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, सय्यद तौफीक, बाबु सय्यद, सतिष गुप्ता, सचिन गायकवाड, परवेज देशमुख, संदीप दिघे, संदीप सानप, ज्ञानेश्वर रोडे, दादा फटांगरे, अजय कोटकर, अशोक भुसाळ, डेमन सांगळे, पैय्याम शेख, फजान शेख, गणेश गडकरी, शाद शेख, संतोष आव्हाड, संकेत कोटकर, संदिप सुपेकर यांनी सहभाग घेतला. या घोडेस्वरांनी पेमगिरी, शिरसगाव धुपे, लहीत, ब्राम्हणवाडा, कळममार्गे डोंगरदर्‍यांतून प्रवास करत रोहकडी येथे मुक्काम केला. मंगळवारी ओतूर, बनकर फाटा, बल्हाळवाडी, जुन्नर मार्गे हे 25 अश्‍वस्वार मोठया उत्साहात किल्ले शिवनेरी येथे पोचले.

या सर्वांचे शिवनेरी गडावर युवानेते सत्यजीत शेरकर, अतुल बेनके यांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी शाम भडांगे, विलास कवडे, योगेश सोनवणे, विलास शिंदे, राजेंद्र देशमुख, नवनीत देशमुख, अजित देशमुख, प्रकाश नवले, अभिजीत जोशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. किल्ले शिवनेरी येथे मराठमोळ्या पध्दतीने फेटे बांधून या घोडेस्वरांचे स्वागत करण्यात आले. सर्वांनी शिवाई मंदीर, राजमाता जिजाऊ व राजे छत्रपतींचे दर्शन घेवून जन्मस्थळास भेट दिली. या ठिकाणी विकास भालेराव, शाहीर शिवाजी कांबळे, रेवणनाथ देशमुख यांनी पोवाड्यामधून कार्यक्रमात रंगत भरली. हिरवाईने नटलेल्या शिवनेरीवर हा प्रसंग अधिकच विलोभनीय ठरला.

 रणजितसिंह देशमुख म्हणाले, गड, किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. अभिमानास्पद ऐतिहासिक वारसा प्रत्येकाने जपला पाहिजे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा समृध्द वारसा, युध्दनिती, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, प्रजेसाठी कल्याणकारी योजना संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरले आहे. या सूवर्ण काळातील अनुभव घेण्यासाठी व हा वारसा युवा पिढीला कृतीतून सांगण्यासाठी संगमनेर तालुक्यातील अश्‍वप्रेमी संघटना व शिवराय निर्माण संघटनेच्या वतीने किल्ले शहागड ते किल्ले शिवनेरीचा हा 65 किमीचा घोडेस्वारीचा प्रवास अद्भूत आनंद देणारा ठरला. डोंगर दर्‍या, चढ-उतार, पायवाटा, रिमझीम पाऊस व सर्वदूर पसरलेली हिरवाई समृध्द व वैभवशाली महाराष्ट्राची अनुभूती देत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घोडे हेच प्रमुख दळण वळणाचे व प्रवासाचे साधन होते. हा प्रवास जिवनातील सर्वात आनंददायी अनुभवाचा ठेवा ठरला आहे. यापुढील काळात शिवराय निर्माण संघटनेच्या वतीने असेच ऐतिहासिक विविध उपक्रम राबविणार असल्याचे ते म्हणाले. यानिमित्ताने ऐतिहासिक घोषणांनी किल्ले शिवनेरी परिसर दुमदूमून गेला होता.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :