शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यात बड्यांचीच नावे

संजय काटे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

आमच्याकडे आलेले सगळे अर्ज आम्ही वरिष्ठांना सादर केले. या योजनेबाबत सगळ्यांपर्यंत माहिती देण्यासाठी वर्तमानपत्रे व सोशल मिडीयाचा आधार घेतला होता. जी नावे यादीत आहेत ते सगळे जाणार हेही अजून निश्चित नाही. सहल जाणार आहे काही नाही याबद्दल अंतीम माहिती नसून गेली तर जिल्ह्यातून नेमके किती जण जाणार हेही ठरलेले नाही

श्रीगोंदे ( जिल्हा नगर)  - राज्य सरकारच्या वतीने परदेशात अभ्यासदौऱ्यासाठी निवड झालेल्या लाभार्थींची यादी आज समोर आल्यानंतर सोशल मिडीयावरुन मोठी आगपाखड सुरु झाली. तालुक्यातून चोवीस जणांना त्यानिमित्ताने परदेशात जाण्याची संधी असली तरी त्यातील अपवाद वगळता नावे ही बड्या नेत्यांच्या घरातील व्यक्ती, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांचीच असल्याने कृषी विभागाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले.

पन्नास टक्के अनुदानावर परदेशातील शेतीचा अभ्यास करुन गावात तो प्रयोग राबविण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने इस्त्राईल, ऑस्ट्रेलिया व जर्मनी या देशात शेतकऱ्यांची परदेश वारी आहे. त्यासाठी नुकताच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात त्याचा लकी-ड्रा काढण्यात आला. विशेष म्हणजे तालुक्यातून त्यासाठी अर्ज भरणाऱ्या सत्तावीस पैकी चोवीस जण लकी ठरले. तीन जणांची वयोमर्यादा न बसल्याने त्यांना डावलण्यात आल्याची सांगण्यात आले. 

यादीतील नावे आज सोशल मिडीयातून समोर आली आणि त्यावरुन मोठा संताप सुरु झाला. कारण शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनेत परदेशात जाण्याचे भाग्य दोन विद्यमान महिला सदस्य, एक जिल्हा बँकेचा संचालक, एक माजी जिल्हा परिषद सदस्य, एक नगरसेवक व इतर काही बड्या नेत्यांच्या घरातील व्यक्ती अथवा पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक यांचा समावेश आहे. 

काही नावे तर अशी आहेत की त्यांनी त्यांच्या शेताचा बांधही पाहिलेला नसेल मात्र तेही अभ्यासदौरा करणार आहेत अशीही टिका होत आहे. सोशल मिडीयावरुन तरुणांनी त्याविरोधात आवाज उठविला आहे. पन्नास टक्के रक्कम भरण्याची ऐपत नसणारे खरे शेतकरी शेतात कष्ट करतात मात्र आलिशान गाड्यांमध्ये फिरणाऱ्यांना शेतीचा अभ्यास करण्यासाठी ही संधी मिळत असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यावरुन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. 

याप्रश्नी तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे म्हणाले, आमच्याकडे आलेले सगळे अर्ज आम्ही वरिष्ठांना सादर केले. या योजनेबाबत सगळ्यांपर्यंत माहिती देण्यासाठी वर्तमानपत्रे व सोशल मिडीयाचा आधार घेतला होता. जी नावे यादीत आहेत ते सगळे जाणार हेही अजून निश्चित नाही. सहल जाणार आहे काही नाही याबद्दल अंतीम माहिती नसून गेली तर जिल्ह्यातून नेमके किती जण जाणार हेही ठरलेले नाही.