प्रकल्प उपअभियंत्याच्या पोटाला लावला चाकू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

नगर - एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम टप्पा-एक योजनेत एका व्यक्तीस लाभार्थी करून घेण्यासाठी महापालिकेच्या घरकुल योजनेचे प्रभारी प्रकल्प उपअभियंता आर. जी. मेहेत्रे यांच्या पोटाला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 

महापालिकेतील विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांच्यासह पाच जणांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार मेहेत्रे यांनी आयुक्त घनश्‍याम मंगळे यांच्याकडे केली. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे मेहेत्रे यांनी त्यांच्याकडील प्रभारी पदभार काढून घेण्याची विनंती आयुक्तांना केली आहे. 

एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम टप्पा-एक व टप्पा-दोन अशा दोन घरकुल योजना महापालिकेने नुकत्याच राबविल्या. त्यातील संपलेल्या टप्पा-एक योजनेत महापालिका कामगार युनियनच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या नातेवाइकास घरकुलाचा लाभ देण्यासाठी विरोधी पक्षनेते बोराटे यांनी मोबाईलवर व नंतर महापालिकेत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम टप्पा-एक व टप्पा-दोनच्या कामाची स्थिती पाहून मेहेत्रे परतत होते. त्या वेळी दोन अज्ञात लोकांनी त्यांच्या पोटाला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी दिली. संबंधित व्यक्तीस घरकुल न मिळाल्यास खून करण्याची धमकी दिली, असे मेहेत्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे.