श्रीगोंद्यात हुमनी अळीचा उसाला विळखा

संजय आ. काटे 
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

यंदा तालुक्यात उशिरा का होईना पण वरुणराजा बरसल्याने शेतातील पिके बहरात आहेत. तालुक्यात उसाचे यंदाही मोठे क्षेत्र आहे. यंदाच्या गाळपाला येणाऱ्या उसाला आता हुमनीने गाठल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हुमनी अळी पिकाच्या मुळांना खात असल्याने वरकरणी ती दिसत नसली तरी पिक खालपासून वाळू लागते. टाकळीलोणार, बेलवंडी या गावांसह बागायती भागात हा प्रादुर्भाव वाढल्याचे कृषी विभागानेही मान्य केले आहे. मात्र या अळीने शेतकऱ्यांच्या झोपा उडविल्या आहेत. 

श्रीगोंदे, (जि. नगर):  उसाचे आगर असणाऱ्या श्रीगोंद्यातील काही भागात हुमनीचा (उन्नी) पिकांना विळखा पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे ऊस वाळले असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.  वीस ते पंचवीस कांड्यावर आलेला ऊस वाळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

यंदा तालुक्यात उशिरा का होईना पण वरुणराजा बरसल्याने शेतातील पिके बहरात आहेत. तालुक्यात उसाचे यंदाही मोठे क्षेत्र आहे. यंदाच्या गाळपाला येणाऱ्या उसाला आता हुमनीने गाठल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हुमनी अळी पिकाच्या मुळांना खात असल्याने वरकरणी ती दिसत नसली तरी पिक खालपासून वाळू लागते. टाकळीलोणार, बेलवंडी या गावांसह बागायती भागात हा प्रादुर्भाव वाढल्याचे कृषी विभागानेही मान्य केले आहे. मात्र या अळीने शेतकऱ्यांच्या झोपा उडविल्या आहेत. 

टाकळीलोणार येथील शेतकरी मुरलीधर कदम म्हणाले, आमच्या भागात उसाच्या मोठ्या क्षेत्रावर हा प्रादुर्भाव वाढला आहे. यंदाच्या गाळपात पहिल्याच महिन्यात जाणारे पंचवीस ते तीस कांड्यावरील ऊसही त्यामुळे वाळले आहेत.  कृषी विभागासह कारखान्यांनी हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदत केली पाहिजे. 
बेलवंडी येथील कृषी मंडळ अधिकारी शिवाजी शिंदे म्हणाले, काही भागात उसाला तर बेलवंडी परिसरातील नव्याने लागवड केलेल्या लिंबू फळबागेत हा प्रादुर्भाव झाल्याचे समजले आहे.  पहिल्या पावसानंतर प्रौढ भुंगेरे सायंकाळी जमिनीतून बाहेर येतात.

प्रथमावस्थेतील अळ्या पिकाची तंतुमुळे खातात. ती उपलब्ध नसल्यास सेंद्रिय पदार्थ खातात. तंतुमुळांचा फडशा पाडल्यानंतर मुख्य मुळे खाण्यास सुरवात केल्याने झाड वाळते. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते. शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते. नुकसान प्रामुख्याने  ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आढळते. ज्या भागात  हा प्रादुर्भाव आहे तेथे कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी पाहणी करतीलच मात्र शेतकऱ्यांनाही त्याबाबत संपर्क साधावा.