पोलिस कोठडीतील तरुणाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

नेवासे - शेवगावच्या हरवणे कुटुंबीयांच्या हत्याकांडातील आरोपी अमोल ऊर्फ संतोष ईश्‍वर पिंपळे (वय 21, रा. गिडेगाव, ता. नेवासे) याने बुधवारी पहाटे येथील पोलिस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाइकांनी त्याच्या मृत्यूबाबत पोलिसांवर संशय व्यक्त केला. 

नेवासे - शेवगावच्या हरवणे कुटुंबीयांच्या हत्याकांडातील आरोपी अमोल ऊर्फ संतोष ईश्‍वर पिंपळे (वय 21, रा. गिडेगाव, ता. नेवासे) याने बुधवारी पहाटे येथील पोलिस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाइकांनी त्याच्या मृत्यूबाबत पोलिसांवर संशय व्यक्त केला. 

अमोल येथील कारागृहातील क्रमांक तीनच्या बराकीत होता. त्याच्यावर हरवणे हत्याकांडाव्यतिरिक्त नेवासे तालुक्‍यात घरफोड्या, दरोडे, तसेच रस्तालूट आदी अकरा आणि नाशिक जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला 18 ऑगस्ट रोजी अटक केली. त्याला आजपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. ती संपण्याआधीच पहाटे त्याने आत्महत्या केली. बराकीत अन्य 11 आरोपी झोपलेले असताना अमोलने दोन टॉवेल एकत्र करून गळफास घेतला. 

अमोलच्या आत्महत्येची माहिती समजताच त्याच्या नातेवाइकांसह कार्यकर्ते नेवासे फाट्यावरील ग्रामीण रुग्णालयात गेले. शोकसंतप्त महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर अधीक्षक घनश्‍याम पाटील, शेवगावचे उपअधीक्षक अभिजित शिवथरे आदींनी कारागृहात येऊन पाहणी केली. 

मारहाणीत मृत्यू? नातेवाइकांचा संशय! 
अमोल पिंपळेला हरवणे हत्याकांडाच्या गुन्ह्यात पोलिसांनी गोवल्यानेच त्याची मानसिक अवस्था बिघडली, असा दावा नातेवाइकांनी केला आहे. असे असले तरी तो आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्यांपैकी नव्हता. कोठडीत त्याच्यासह इतर 11 आरोपी असतानाही त्याच्या आत्महत्येचा सुगावा कोणालाच कसा लागला नाही, असा प्रश्‍नही उपस्थित करत कैद्यांच्या किंवा पोलिसांच्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला.

टॅग्स