'संत ज्ञानेश्वर मंदिर विकास आराखडा कामांना चालना द्या, अन्यथा आंदोलन'

सुनील गर्जे 
रविवार, 10 सप्टेंबर 2017

नेवाशाचे तहसीलदार उमेश पाटील यांना उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, ऍड. बन्सी सातपुते, महेश मापारी, बाळासाहेब कोकणे, नगरसेवक अड. बापूसाहेब गायके, लक्ष्मण जगताप, फारूक आतार, सचिन वडागळे यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, संत ज्ञानेश्वर मंदिरपरीसर विकास आराखड्याचे जवळपास पंचवीस ते तीस वर्ष प्रलंबित मागणी बाबत माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आमदार असतांना पाठपुरावा केला.

नेवासे : नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिर विकास आराखड्यातील प्रदीर्घकाळ रेंगाळलेल्या कामांना चालना देऊन प्रकल्प लवकर पूर्ण करण्याबाबत नेवासे तालुक्यातील वारकरी व नेवासे शहरातील नागरिकांच्या वतीने तहसीलदारांना उपोषण पूर्वसूचनांचे निवेदन देण्यात आले. तालुक्याचे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे विकासकामे रेंगाळल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

नेवाशाचे तहसीलदार उमेश पाटील यांना उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, ऍड. बन्सी सातपुते, महेश मापारी, बाळासाहेब कोकणे, नगरसेवक अड. बापूसाहेब गायके, लक्ष्मण जगताप, फारूक आतार, सचिन वडागळे यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, संत ज्ञानेश्वर मंदिरपरीसर विकास आराखड्याचे जवळपास पंचवीस ते तीस वर्ष प्रलंबित मागणी बाबत माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आमदार असतांना पाठपुरावा केला. जून २०११ मध्ये मंत्रालयाकडून प्रकल्पाला मंजुरी आणली. पंढरपूर, देहू, आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला. १२.८५ कोटीचा निधी मंजूर झाला त्याला आता तब्बल सहावर्ष उलटून गेली तरी हा प्रकल्प पूर्ण होत नाही. त्यातील अनेक कामे अर्धवट ठेवले असून हा प्रकल्प शासकीय अधिकार्याच्या व लोकप्रतिनिधीच्या अक्षम्य दुर्लक्षित पणामुळे तो विनाकारण रखडत पडला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असून वर्षभर हजारो वारकरी, श्रद्धाळू व भाविक भक्त याठिकाणी दर्शनासाठी येतात. दर एकादशीला मोठ्याप्रमाणात वारकरी मंदिरात दर्शनासाठी येतात. मोठ-मोठी पारायणे येथे होतात. आषाढी व कार्तिकी एकादशीला याठिकाणी गर्दीचा महापूर येथ असल्याने मंदिर परिसरात आणि शहराला यात्रेचे स्वरूप येते. हजारो पर्यटक हि याठिकाणी भेटी देतात. पार जिल्ह्यातून दरवर्षी आळंदी, पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या अनेक दिंड्या माउलींच्या दर्शनासाठी नित्यनेमाने येतात. मात्र जवळपास तेरा कोटीचा निधी सहा वर्षांपासून मंजूर असतांनाही सुविधा अभावी हजारो-लाखो भक्तांची मोठे कुचंबणा होते. वास्तविक पहाता नेवाशाच्या लोकप्रतिनिधीनेही या कामात लक्ष घालण्याची गरज आहे. मात्र निधी मंजूर असतांना आणि शासनाची किंवा कुणाचीही आडकाठी नसतांनाही हे काम का रखडत ठेवले जाते. 

महाराष्ट्रत ज्या-ज्या तीर्थस्थळांचा नियोजनबध विकास झाला आहे. तेथील शहरांचाही योग्य पद्धतीने विकास झाला आहे. त्यात शिर्डी, देहू, आळंदी, पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर आदी शहरांची उदाहरणे आहे म्हणून नेवासे शहराच्या विकासाला चालना मिळण्यासाठी संत ज्ञानेश्वर मंदिर परिसर विकास आराखड्याची कामे पंधरा दिवसात पूर्ण करावी अशी विनंती निवेदनात करून अन्यथा या रखडलेल्या प्रकल्पांच्या अपूर्ण कामांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील वारकरी व नेवासे शहरातील नागरिकांच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.