शाळेचा स्लॅब कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

नगर जिल्ह्यातील घटना; वर्गशिक्षिकेसह तेरा जखमी
नगर - निंबोडी (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाचवीच्या वर्गाच्या इमारतीच्या छताचा स्लॅब कोसळून सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. वर्गशिक्षिका व 12 विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.

नगर जिल्ह्यातील घटना; वर्गशिक्षिकेसह तेरा जखमी
नगर - निंबोडी (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाचवीच्या वर्गाच्या इमारतीच्या छताचा स्लॅब कोसळून सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. वर्गशिक्षिका व 12 विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.

त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्रेयस प्रवीण रहाणे (वय 11), वैष्णवी प्रकाश पोटे (वय 11) व सुमीत सुनील भिंगारदिवे (वय 11, सर्व रा. निंबोडी, ता. नगर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. निंबोडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटण्याच्या वेळी जोरदार पावसाला सुरवात झाली. पाचवीच्या वर्गातील अर्धे विद्यार्थी बाहेर आले असतानाच या वर्गखोलीच्या छताचा स्लॅब कोसळला. त्या वेळी शिक्षिका लीना पाटील यांच्यासह 15 विद्यार्थी वर्गात होते.

स्लॅब कोसळण्याचा आवाज ऐकून जवळच राहणाऱ्या शंकर बेरड तातडीने घटनास्थळी आले. गावातील तरुणही मदतीसाठी धावले. महापालिकेचे अग्निशामक दल, जिल्हा प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन व पोलिस निंबोडीत दाखल झाले. जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून मिळेल त्या वाहनाने शहरातील रुग्णालयात हलविले. अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आदींनी शाळेला भेट दिली.

वर्गशिक्षिकेचे धाडस
शाळा सुटण्याला पाच मिनिटांचा अवधी असताना पाऊस सुरू झाला. त्यामुळे वस्तीवरील विद्यार्थी लवकर घरी जावेत, या उद्देशाने शिक्षकांनी पाच मिनिटे आधी शाळा सोडली. वर्गातून अर्धे विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर छताचा स्लॅब कोसळला. तशा परिस्थितीतच वर्गशिक्षिका लीना पाटील यांनी जिवाची पर्वा करता वर्गात प्रवेश केला. जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी छताचा दुसरा भाग कोसळल्याने पाटील जखमी झाल्या.