राष्ट्रवादीकडून मुलाखतींचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

211 इच्छुकांनी दिली पूर्वपरीक्षा; फलटणमधून सर्वाधिक 99 जण इच्छुक

211 इच्छुकांनी दिली पूर्वपरीक्षा; फलटणमधून सर्वाधिक 99 जण इच्छुक
सातारा - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज राष्ट्रवादी भवनात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षातील इच्छुक उमेदवारांची आज पूर्वपरीक्षा झाली. पहिल्या दिवशी फलटण, वाई, महाबळेश्‍वर आणि खंडाळा तालुक्‍यांतील 211 इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. यामध्ये फलटणमधून 99, खंडाळा तालुक्‍यातून 28, वाईतून 60, महाबळेश्‍वरातून 14 इच्छुकांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी भवनात सकाळी दहा वाजल्यापासून चार तालुक्‍यांतील इच्छुकांची गर्दी झाली होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेतील पक्षप्रतोद बाळासाहेब भिलारे, पक्षनिरीक्षक सुरेश घुले, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, वाईचे आमदार मकरंद पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

साधारण तीन तालुक्‍यांतील 19 गट आणि 38 गणांतील एकूण 211 इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. फलटण आणि वाई तालुक्‍यांतील बहुतांशी गण हे महिला राखीव असल्याने आज मुलाखतीसाठी महिलांची संख्याही मोठी होती. सुरवातीला फलटण तालुक्‍यातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. येथे सर्व गट व गण खुले असल्याने इच्छुकांची संख्या अधिक आहे, तर चार गट सात गण महिलांसाठी राखीव असल्याने महिलांची संख्या मोठी होती. रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी तरडगाव, हिंगणगाव या दोन गटांतून, तर शिवांजलीराजे निंबाळकर कोळकी गटातून अर्ज भरला आहे; पण ते दोघेही बाहेरगावी असल्याने मुलाखतीला येऊ शकलेले नाहीत. त्यांना पुन्हा 22 जानेवारीला मुलाखतीसाठी बोलावण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या संपर्क सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यानंतर खंडाळा आणि दुपारनंतर वाई व महाबळेश्‍वर तालुक्‍यांतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. राष्ट्रवादी भवनाच्या आवारात सकाळी दहापासूनच इच्छुकांसह कार्यकर्ते आणि त्यांच्या अलिशान वाहनांनी आवार भरून गेले होते. राष्ट्रवादी भवनासमोरील लोणंद रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या सुमारे शंभरहून अधिक अलिशान वाहने सर्वांचे लक्ष वेधत होती.

'मावळ्यां'च्या मुलाखती गुरुवारी
शिवसेनेतून लढण्यास इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती उपनेते अनंत तरे, पालकमंत्री विजय शिवतारे, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, आमदार शंभूराज देसाई हे घेणार आहे. गुरुवारी (ता. 19) येथील गोडोली नाक्‍याजवळील हॉटेल लेक व्ह्यू हॉलमध्ये मुलाखती होतील, अशी माहिती जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी दिली. गुरुवारी सकाळी 9 ते 11 दरम्यान वाई विधानसभा मतदारसंघ, सकाळी 11 ते दुपारी 12 पर्यंत माण-खटाव, दुपारी 12 ते एक फलटण, दुपारी एक ते दोन पाटण, दुपारी दोन ते तीन कऱ्हाड उत्तर, दुपारी तीन ते चार कऱ्हाड दक्षिण, सायंकाळी चार ते पाच कोरेगाव, पाच ते सहा वाजेपर्यंत सातारा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती होतील.