हेलिकॉप्टरने पैसा वाटा; विजय राष्ट्रवादीचाच 

Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar

सांगली - राज्यातील कॉंग्रेस आघाडी तोडण्याचे काम साताऱ्यातील नेत्यांनी केले आहे. आता त्यांनी गाड्यांनी नाही, तर हेलिकॉप्टरनेही पैसा वाटला तरी इथे विजय राष्ट्रवादीचाच होईल, असा विश्‍वास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज येथे व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार शेखर गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात कार्यकर्ता मेळावा झाला. या वेळी नेत्यांनी कॉंग्रेस नेत्यांना लक्ष्य करीत विधान परिषद निवडणुकीत आघाडी तुटली तर ते पाप कॉंग्रेसचे असल्याचा पुनरुच्चार केला. 

श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, ""निधर्मी पक्षांची आघाडी टिकवण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र साताऱ्यांतील नेत्यांना जोडण्यापेक्षा तोडण्यातच स्वारस्य आहे. त्यांच्या पैशाला मतदार कार्यकर्ते बळी पडणार नाहीत. तुमचा पैसा गाड्यांनी काय, हेलिकॉप्टरने वाटा... आमचे कार्यकर्ते दाद देणार नाहीत. जयंतराव तुम्ही नियोजन करा; आम्ही कमी पडणार नाही.'' 
आमदार पाटील म्हणाले, ""जातीयवाद्यांना सत्तेतून दूर ठेवण्यास 1999 पासून आघाडीचा धर्म पाळला जात आहे. आघाडीच्या सूत्राला यंदा कॉंग्रेसकडून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांनी 5 नोव्हेंबरपर्यंत (अर्ज माघारीचा दिवस) फेरविचार करावा. आम्ही अद्यापही आघाडीसाठी प्रयत्नशील आहोत याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असा घेऊ नका. बिघाडी झाल्यास राष्ट्रवादीची ताकद महाराष्ट्रात दाखवू. सध्या सहापैकी पाच ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. साहजिकच तिथे राष्ट्रवादीलाच संधी मिळायला हवी. आमचे सारे मतदार कॉंग्रेसविरोधात लढूनच पुढे आले आहेत. कार्यकर्त्यांना गृहीत धरणाऱ्यांचा मात्र भ्रमनिरास होईल. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा आणि राजारामबापूंची जिल्ह्याला नैतिक शिकवण आहे. धनशक्तीला ताकदीने विरोध करू. किमान सव्वाशे मतांनी गोरे विजयी होतील.'' 

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ""कॉंग्रेसने प्रथम उमेदवारीची घोषणा करून हटवादी, अहंपणा दाखवला आहे. ही निवडणूक इतिहास घडवणारी, भविष्यातील राजकारणाला कलाटणी देणारी आहे. राष्ट्रवादीचा बुरुज कायम ठेवू. सांगलीतून बरोबरी द्या. साताऱ्यातून शंभर मतांची आघाडी घेऊ. जयंतरावांनी ठरवले तर ते कोणाचाही कार्यक्रम करू शकतात. मतदारांनी सगळीकडून पाहुणचार घ्यावा. मात्र शेखर गोरे यांनाच पाहुणचार करावा.'' 
श्री. गोरे म्हणाले, ""राष्ट्रवादीने दुष्काळी भागातील कार्यकर्त्यांला संधी दिली आहे. भविष्यात दुष्काळी भागाच्या विकासासाठी प्रयत्न करु.'' 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष स्नेहल पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील, आमदार सुमन पाटील, प्रभाकर घार्गे, दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, माजी आमदार मानसिंगराव नाईक, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, अरुण लाड, संजय बजाज, अमरसिंह देशमुख, देवराज पाटील, लिंबाजी पाटील, उषाताई दशवंत, झेडपी, महापालिका व नगरपालिकांचे सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती या वेळी उपस्थित होते. 

पृथ्वीराज चव्हाण लक्ष्य 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नामोल्लेख टाळून लक्ष्य केले. आमदार शिंदे म्हणाले, ""स्वतःचा पक्ष संपला तरी चालेल. मात्र मित्र पक्ष वाढणार नाही, अशी त्यांची भूमिका असते. त्यामुळेच राज्यातील सत्ता गेली. धनशक्तीलाच ते वाढलेली प्रचंड ताकद समजतात.'' जयंत पाटील म्हणाले, ""राष्ट्रवादीचे खच्चीकरण करण्यातच कॉंग्रेस नेत्यांना रस आहे. काहींचा अतिआत्मविश्‍वास नडतोय. धनशक्तीच्या जोरावर मतदारांची खरेदी होऊ देणार नाही.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com