साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच प्रभावी

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच प्रभावी

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यातही महत्त्वाचे म्हणजे जिल्हा शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा आहे, हे राष्ट्रवादीच्या मतदारांनी दाखवून दिले. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही प्रभाव स्पष्ट दिसत आहे. जिल्ह्यात एकेकाळी वैभवशाली दिवस पाहिलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाला बगल देत स्थानिक उमेदवारांसाठीच मते दिली. शिवसेनेला मात्र मतदारांनी नाकारले. उमेदवारांची पार्श्‍वभूमी, शेतीमालाचे भाव या मुद्द्यांना मतदारांनी प्राधान्य दिल्याचे ‘सकाळ’ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. 
 

सर्वेक्षणातील ठळक निष्कर्ष
निवडणुकीत मतदान करताना ४० टक्के मतदारांनी (सर्वेक्षणात सहभागी झालेल्या) पक्षापेक्षा उमेदवाराची पार्श्‍वभूमी महत्त्वाची मानली आहे. त्याखालोखाल पक्ष (२४ टक्के), पक्षाचे नेतृत्व (२१ टक्के), पक्षाचा कार्यक्रम (९ टक्के) या बाबी त्यांनी विचारात घेतल्या आहेत. 
जात आणि धर्म हे मुद्दे या निवडणुकीत नगण्य ठरले. जेमतेम २ टक्के मतदारांनी उमेदवार निवडताना हा निकष वापरला आहे. 
निवडणुकीतील पैशाचा वाढता वापर, यावर विविध स्तरांवर चिंता व्यक्त केली जाते. मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण जनतेने या विषयाला फारसे महत्त्व दिले नाही. हा मतदानावर प्रभाव टाकणारा घटक ठरल्याचे केवळ ४ टक्के नागरिकांना वाटते. 

राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. आपण या पक्षाला पाठिंबा दिला असल्याचे सुमारे ४६ टक्के मतदारांनी सांगितले आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा जिल्ह्यातील मतदारांवर मोठा प्रभाव असल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले. पवार यांच्या नेतृत्वामुळेच आपण राष्ट्रवादीला मत दिल्याचे ५० टक्के नागरिकांनी स्पष्ट केले. स्थानिक उमेदवार हा मुद्दा ३२ टक्के मतदारांनी विचारात घेतला. 

शरद पवारांचीच ‘पॉवर’ 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जिल्ह्यातील मतदारांवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केल्याचे ५० टक्के नागरिकांनी सांगितले. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हाच मुद्दा महत्त्वाचा होता, असे भाजप समर्थकांकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर १६ टक्के नागरिकांनी विश्‍वास दाखविला. राष्ट्रवादीला हा ‘सावधान’तेचा इशाराच आहे.

भाजपची मदार मोदींवरच 
पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत भारतीय जनता पक्षाने वर्चस्व मिळविले आहे. मात्र, भाजपची ही लाट सातारा जिल्हा परिषदेत दिसली नाही. आपण या पक्षाच्या उमेदवारांना मत दिले नसल्याचे ७९ टक्के मतदारांनी नमूद केले आहे. 
भाजप हा इतरांहून वेगळा पक्ष आहे काय, या प्रश्‍नाला १४ टक्के मतदारांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. 
ज्यांनी भाजपला मत दिले, त्यांनी स्थानिक उमेदवार कोण आहे, याला फारसे महत्त्व दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हाच मुद्दा त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता, असे भाजप समर्थकांपैकी ४२ टक्के मतदारांनी स्पष्ट केले. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर १६ टक्के मतदारांनी भरवसा व्यक्त केला आहे. 
स्थानिक उमेदवार, हा मुद्दा १८ टक्के मतदारांनी विचारात घेतला आहे. 
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या पारदर्शकतेचा हा विषय खूप गाजला. ग्रामीण भागात त्याची विशेष दखल कोणी घेतली नाही. फक्त दहा टक्के मतदारांनी पारदर्शकतेवर गंभीरपणे विचार केला आहे. 

शिवसेनेचा प्रभाव दिसेना
शिवसेना हा पक्ष पाटण तालुका वगळता जिल्हा स्तरावर फार प्रभाव टाकू शकला नाही. या पक्षाला मतदान केल्याचे ११ टक्के मतदारांनी सांगितले. उर्वरित ८९ टक्के मतदान अर्थातच विरोधात झाले. 
शिवसेनेला ज्यांनी मत दिले, त्यांपैकी २७ टक्के मतदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे पाहून हा निर्णय घेतला. त्या खालोखाल स्थानिक उमेदवार आहे, म्हणून ३६ टक्के नागरिकांनी संबंधितांना आपली पसंती दिली. 
‘मराठी माणूस’ हा विषय जिल्ह्यातील निवडणुकीत विशेष चर्चेत नव्हता. मतदारांनीही तो विचारात घेतला नाही. 

चेहरा हरवलेली काँग्रेस
भाजपला नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीला शरद पवार यांचा स्पष्ट चेहरा असल्याचे मतदारांनी दाखविले. मात्र, काँग्रेसला चेहराच नसल्याचेही दाखवून दिले. काँग्रेसच्या अवघ्या १८ टक्‍के मतदारांनी राहुल गांधींचे नेतृत्व मान्य केले. पक्षालाही अत्यल्प म्हणजेच १९ टक्‍के काँग्रेसजणांनी पसंती दिली. जे काही उमेदवार उभे होते, त्यांच्याकडे पाहून मतदान केल्याचे ६३ टक्‍के मतदारांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरचा विश्‍वास २७ टक्के नागरिकांनी व्यक्त केला. तेथेही स्थानिक नेतृत्व व उमेदवार फॅक्‍टर महत्त्वाचा ठरला. 

प्रमुख निष्कर्ष
काँग्रेस पक्षाला ठराविक भागात यश मिळाले. अवघ्या १७ टक्के नागरिकांनी या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. 
एका कुटुंबातील सगळ्यांनी एकाच विशिष्ट पक्षाला वा उमेदवाराला मतदान केले, असेही पुढे आले. ७७ टक्के नागरिकांनी घरातील मतांची विभागणी झाली नसल्याचे सांगितले. 
दोन पिढ्यांमधील अंतरामुळे घरातील मतांची विभागणी झाली असल्याचे ६० टक्के नागरिकांनी मान्य केले आहे. पैशामुळे मतविभागणी झाल्याचे २४ टक्के मतदारांचे म्हणणे आहे. उमेदवाराच्या गुंडगिरीच्या पार्श्‍वभूमीमुळे मतदान केले नसल्याचे १७ टक्के लोकांनी सांगितले. 
इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये घोटाळा नसल्याचे ८१ टक्के मतदारांना वाटते तर, १९ टक्के नागरिकांना या मतदान यंत्रांत घोटाळा झाल्याचे वाटते. 
जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादीला हरविण्यासाठी मतदान केल्याचे ४८ टक्‍के मतदारांनी सांगितले, तर ५२ टक्‍के लोकांनी सत्ताधारी राष्ट्रवादीला पसंती दिली. 
जिल्हा परिषदेत भाजपला हरविण्यासाठी मतदान केल्याचे २८ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. या उलट सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला हरविण्यासाठी ३४ टक्के मतदारांनी मतदान केले. शिवसेनेला हरविण्यासाठी १० टक्के; तर, काँग्रेसला हरविण्यासाठी २६ टक्के मतदारांनी मतदान केले. 
नोटाबंदी हा मुद्दाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नव्हता, असे ६८ टक्के नागरिक म्हणाले, तर हा निकाल म्हणजे नोटाबंदीला पाठिंबा नसल्याचे तसेच नोटाबंदीला कौल असल्याचेही प्रत्येकी १६ टक्‍के नागरिकांनी सांगितले. 
शेतीमालाचे भाव हा घटक ग्रामीण भागातील मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. जिल्ह्यातील २९ टक्के नागरिकांनी शेतीमाल भाव हाच घटक प्रभावशाली ठरल्याचे सांगितले. 
जलयुक्त शिवार योजनेचा मतदारांवर प्रभाव पडल्याचे २३ टक्के नागरिकांनी सांगितले. 
सत्ता बदलाला साथ देण्यासाठी मतदान केल्याचे केवळ २२ टक्के नागरिकांनी सांगितले. नेत्यांच्या पक्षांतरामुळे फारसा परिणाम झाला नसल्याचेही दिसून आले. हा मुद्दा १० टक्‍के नागरिकांनी विचारात घेतला. 
पीक विमा योजना ग्रामीण भागातील मतदारांवर प्रभाव टाकण्यास उपयुक्त ठरल्याचे सहा टक्के मतदारांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com