‘राष्ट्रवादी’च्या स्वाभिमानाचा मोडला कणा

‘राष्ट्रवादी’च्या स्वाभिमानाचा मोडला कणा

सोलापूर - स्थापनेपासून सोलापूर महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा यंदाच्या महापालिका निवडणुकीत मात्र स्वाभिमानाचा कणा मोडला आहे. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी शहराची राष्ट्रवादी काँग्रेस अक्षरशः लाचार झाल्याचेच गेल्या आठ दिवसांमधील घडामोडींतून स्पष्ट झाले आहे. 

राष्ट्रवादीत आजपर्यंत झालेल्या गटबाजीत पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाचे झालेले तीन तेरा आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे केलेले दुर्लक्ष, या सर्वांचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीला काँग्रेसचा आधार घ्यावा लागत आहे. राज्याचे हेवीवेट नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभारी म्हणून सोलापूरची धुरा स्वीकारल्यानंतरही महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला लाचारी पत्कारावा लागली, हे विशेष. सुरवातीला स्वबळाची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीला जनमताचा आणि इच्छुकांचा कौल अगोदरच लक्षात आला होता. हा कौल पाहून स्वबळाची भाषा आघाडीत रूपांतरित झाली. काँग्रेस आघाडीतून सुरवातीला ४५ जागांची मागणी, त्यानंतर ४०, ३२ आघाडी तुटण्याच्या वेळेस तर २८ पर्यंत जागा घेण्याची तयारी सोलापूर राष्ट्रवादीने दर्शविली होती. १९९९ पासून ते २०१५ पर्यंत सोलापूर महापालिकेत उपमहापौर पदासह इतर महत्त्वाच्या समित्यांवर सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादीची यंदाच्या महापालिका निवडणुकीत पुरती फरफट झाली. लोकसंघटन आणि राजकारणातील सर्व टॅक्‍टीस वापरण्यात विद्यमान अध्यक्ष भारत जाधव कमकुवत ठरल्याने त्यांच्या जोडीला चाणाक्ष निरीक्षक प्रदीप गारटकर यांना देण्यात आले. गारटकर सोलापुरात राष्ट्रवादीचे नाही तर ठराविक गटाचे झाल्याने त्यांचा प्रभाव फारसा चालू शकला नाही. गारटकरांना पाठवून देखील पक्षाची वाताहत सावरता येत नसल्याने सोलापूरचे प्रभारीपद अजित पवारांनी स्वत:कडे घेतले. सोलापूरच्या राष्ट्रवादीची गटबाजी पाहून अजित पवारांनीही डोक्‍याला हात लावला असेल. आता राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याचे ठरविले असून जाणकारांना आता राष्ट्रवादीचा निकाल स्पष्ट दिसू लागला आहे.       

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे दिलीप कोल्हे, प्रवीण डोंगरे, खैरुनिस्सा शेख, बिस्मिला शिकलगार, इब्राहिम कुरेशी यासारखे प्रभावी उमेदवार असताना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्य मतदारसंघातून राष्ट्रवादीने विद्या लोलगे यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीतील राज्याच्या व देशाच्या नेतृत्वाने घेतला. मध्यमधील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना ही एकप्रकारची राष्ट्रवादीने केलेली मदतच होती. त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या एकाही विद्यमान नगरसेवकाला संधी मिळाली असती तर कदाचित शहर मध्यचा निकाल वेगळा लागला असता, अशी चर्चा आजही आहे.  

राष्ट्रवादीने २०१२ मध्येच गमावली संधी
(कै.) तात्या कोठे हे हयात असताना २०१२ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी महेश कोठे राष्ट्रवादीत येणार, याबाबत चर्चा व चाचपणीही झाली. अजित पवार यांच्यासोबत भेटीही झाल्या. पक्षाध्यक्ष शरद पवार व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे स्वतंत्र आहेत असा विश्‍वास कोठे यांना देण्यात राष्ट्रवादी कमी पडली. शिंदे व पवार एकच असल्याचा विश्‍वास कोठेंना झाल्यानंतर त्यांनी त्या वेळी पक्षांतराचा निर्णय थांबविला. त्या वेळी जर महेश कोठेंना राष्ट्रवादीने विश्‍वास दिला असता तर आज महापालिकेत व सोलापुरात राष्ट्रवादीची परिस्थिती निश्‍चित वेगळी दिसली असती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com